नवीन गाळे अन्य व्यावसायिकांना देऊ नका
By Admin | Updated: July 29, 2016 01:08 IST2016-07-29T01:08:53+5:302016-07-29T01:08:53+5:30
पंचायत समितीच्या वतीने येथील व्यावसायिकांच्या दुकानांच्या मागे नवीन संकुलात १० गाळ्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.

नवीन गाळे अन्य व्यावसायिकांना देऊ नका
पत्रकार परिषद : एटापल्लीतील व्यावसायिकांची मागणी; पं. स.तर्फे बांधकाम
एटापल्ली : पंचायत समितीच्या वतीने येथील व्यावसायिकांच्या दुकानांच्या मागे नवीन संकुलात १० गाळ्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. परंतु सदर गाळ्यांकरिता ३ लाख रूपये अनामत रक्कम परस्पर दुसऱ्या व्यावसायिकांकडून घेण्यात आली आहे. या गाळ्यांवर त्यांचा हक्क प्रस्थापित होणार आहे व अनेक वर्षांपासून असलेली आमची दुकाने हटविली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन गाळे इतरांना न देता ते आम्हालाच द्यावे, अशी मागणी येथील व्यावसायिकांनी बुधवारी पत्रकार परिषदेतून केली.
१० ते २० वर्षांपासून व्यावसायिक आपला व्यवसाय थाटून आहेत. या दुकानांवरच व्यावसायिक आपला उदनिर्वाह करीत आहेत. मात्र दुकानांच्या मागे गाळे बांधकाम करताना आपल्याला पूर्वसूचना देण्यात आलेली नाही. शिवाय व्यावसायिकांचे अतिक्रमणही काढण्यात आले नाही. दुकानांच्या मागे गाळे बांधकाम होत असल्याने याकरिता पत्येकी तीन लाख रूपये अनामत रक्कम इतरांकडून जमा करण्यात आली आहे. मात्र यासंदर्भात आपल्याला कोणतीही सूचना दिलेली नाही. परस्पर दुसऱ्यांकडून तीन लाख रूपये घेऊन गाळे आरक्षित करण्यात आले आहेत. नवीन गाळ्याकरिता सरसकट तीन लाखांची मोठी रक्कम छोट्या व्यावसायिकांना परवडण्यासारखी नाही. व्यावसायिकांची आर्थिक स्थिती तीन लाख रूपये अनामत रक्कम भरण्याची नसल्याने नवीन गाळे इतरांना न देता आम्हालाच द्यावेत, अशी मागणी व्यावसायिक नंदलाल सरकार, नारायण मंडल, संध्या सरकार, प्रदीप बर्मन, साधना मंडल, विमल शील, इंदू वाळके यांनी पत्रकार परिषदेतून केली. पं. स. सभापती दीपक कुलसंगे यांच्याकडून ३० हजार रूपयांची मागणी करण्यात आली, असा आरोपही व्यावसायिकांनी केला. (तालुका/शहर प्रतिनिधी)