मदतीतून कर्ज कपात करू नका
By Admin | Updated: March 26, 2016 00:59 IST2016-03-26T00:59:59+5:302016-03-26T00:59:59+5:30
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलेली मदत बँका कर्ज कपातीसाठी वापरत आहेत. हा शेतकऱ्यांवर एक प्रकारचा अन्याय असून ...

मदतीतून कर्ज कपात करू नका
नामदेव उसेंडी यांचे आवाहन : क्षेत्र भेटीदरम्यान शेतकरी, शेतमजुरांशी चर्चा
गडचिरोली : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलेली मदत बँका कर्ज कपातीसाठी वापरत आहेत. हा शेतकऱ्यांवर एक प्रकारचा अन्याय असून याचा शेतकऱ्यांनी विरोध केला पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी म्हटले आहे.
गडचिरोली तालुक्यातील बोदली, बामणी, सावरगाव, खुर्सा येथील शेतकरी, शेतमजूर यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष गावांना भेट देऊन तेथील शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, युवक काँग्रेस लोकसभा अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, तालुका उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, राकेश गणवीर आदी उपस्थित होते.
चर्चा करताना शेतकऱ्यांनी सांगितले की, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाने रक्कम जमा केली. ही रक्कम बँक प्रशासन कर्ज कपातीसाठी वापरत आहे. पैसे काढण्याकरिता जाणाऱ्या शेतकऱ्यांकडून सातबारा व तहसीलदारांकडून संमतीपत्र मागितल्या जात असल्याचे शेतकऱ्यांनी डॉ. उसेंडी यांना सांगितले. ही बाब अन्यायकारक असल्याने बँकांनी अशा प्रकारचे धोरण अवलंबू नये, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी त्याचा विरोधही करण्याचे आवाहन केले.
यावेळी बोदलीचे सरपंच आकाश निकोडे, माजी सरपंच भगवान चिळंगे, विनोद निकोडे, कत्रोजवार, पिपरे, बामणी येथील रेखाताई गुज्जलवार, धुंडाजी कोकोडे, सखाराम सहारे, धाईत, पंदीलवार, आखाडे, कुरूडकर, वाढई, मुखरू सहारे, खुर्सा येथील उद्धव रामटेके, आनंदराव सिरसागर, सावरगाव येथील गजानन मडावी, खुशाल मडावी, माजी सरपंच सिडाम यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मदतीच्या रक्कमेवर पूर्णपणे शेतकऱ्यांचा अधिकार आहे. त्यामुळे त्या रक्कमेचा उपयोग कोणत्या कामासाठी करायचा यासाठी शेतकरी स्वतंत्र आहे. मदतीची रक्कम कर्ज कपातीसाठी वापरणे बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उसेंडी यांनी दिला आहे.