दिवाळी भेटीने आदिवासींच्या चेहऱ्यावर हास्य
By Admin | Updated: November 14, 2015 01:33 IST2015-11-14T01:33:04+5:302015-11-14T01:33:04+5:30
पोलीस महासंचालकांच्या जिल्हा दौऱ्यानंतर दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांना सर्वच स्तरातून मदतीचे आवाहन करण्यात आले होते.

दिवाळी भेटीने आदिवासींच्या चेहऱ्यावर हास्य
पोलीस दलाकडून साहित्य वाटप : एटापल्ली, भामरागड, जिमलगट्टा, पेंढरी, आसरअल्ली भागात दिला लाभ
गडचिरोली : पोलीस महासंचालकांच्या जिल्हा दौऱ्यानंतर दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांना सर्वच स्तरातून मदतीचे आवाहन करण्यात आले होते. याला साद घालत दिवाळी सणाचे औचित्य साधून मुंबई, पालघर, नाशिक येथील पोलिसांनी जिल्ह्याच्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना विविध जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा केल्याने आदिवासी बांधवांच्या ेचेहऱ्यावर हास्य फुलले आहे.
पोलिसांनी एटापल्ली, भामरागड, धानोरा, कोरची तालुक्यासह जिमलगट्टा, पेंढरी, आसरअल्ली भागात आदिवासी बांधवांना कपडे, भांडी, खेळाची साहित्य अशा विविध जीवनावश्यक साहित्यांचा पुरवठा दिवाळी भेट म्हणून केला. विविध पोलीस मदत केंद्र, उपपोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नक्षलविरोधी अभियान राबवित अनेक गावांना भेटी दिल्या. जनतेच्या घरोघरी पोहोचून त्यांना भेटवस्तू दिल्या. अद्यापही सदर कार्य सुरू आहे. दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या जीवनात दिवाळी सणातही सुविधांचा अंधार राहू नये, याकरिता पोलिसांनी दिवाळी निमित्त नवीन कपडे, मुलांना खेळणी, महिलांना साड्या, आदिवासी बहिणींना भाऊबिजेची ओवाळणी दिली. या अनोख्या उपक्रमातून आदिवासी जनता व पोलीस विभागात नवीन नाते निर्माण करण्याचा प्रयत्न पोलीस विभागामार्फत करण्यात आला. ग्राम भेटीसोबतच मेळाव्याच्या माध्यमातून व्हॉलिबॉल, क्रिकेटबॅट, थाळी, भांडी, साडी, पँट, टी- शर्ट, ट्रॅकसुट व इतर साहित्य वितरित केले जात आहेत. स्थानिक संपर्क विकसित करीत असताना कुठल्याही एका साचेबद्ध पद्धतीने काम न करता स्थानिकांची आवड व त्यांची गरज ओळखून विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचून जनतेच्या विकासोबतच विश्वास संपादन करण्यात पोलीस विभागाला यश येत आहे. दुर्गम भागातील आदिवासींच्या चेऱ्यावर दिवाळी भेटीच्या निमित्ताने का होईना हास्य फुलले आहे. दुर्गम भागातील नागरिक नक्षल चळवळीच्या प्रभावात न येता त्यांनी स्वत:चा सर्वांगिण विकास करावा, याकरिता पोलीस विभागामार्फत जनजागृती केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)