रोवणी केलेल्या शेतजमिनीला पाण्याअभावी पडल्या भेगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:25 IST2021-07-21T04:25:02+5:302021-07-21T04:25:02+5:30
चामोर्शी : तालुक्यातील सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी दहा दिवसांपूर्वी शेतात रोवणी केली. मात्र रोवणी झाल्यानंतर पिकाला आवश्यक अधूनमधून पाणी ...

रोवणी केलेल्या शेतजमिनीला पाण्याअभावी पडल्या भेगा
चामोर्शी : तालुक्यातील सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी दहा दिवसांपूर्वी शेतात रोवणी केली. मात्र रोवणी झाल्यानंतर पिकाला आवश्यक अधूनमधून पाणी मिळत नसल्याने रोवणी केलेल्या शेतजमिनीलाच भेगा पडत असून, धानपीक धाेक्यात आले आहे.
आपल्याजवळील उपलब्ध पाण्याचा वापर करीत शेतकऱ्यांनी शेतात रोवणीचे काम केले. मात्र पिकाला पाणी उपलब्ध नसल्याने रोवणी केलेले धानपीक वाढण्याऐवजी पाण्याअभावी वाढ खुंटून गेल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील बहुतांश भागात अजूनही रोवणीच्या कामास सुरुवात झाली नाही. काही शेतकरी आपल्या शेतालगतच्या नाल्यातील पाणी शेतात ऑइल इंजिनच्या साहाय्याने आणून कशीबशी रोवणी करीत आहेत. यासाठी मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
पावसाने दडी मारल्याने शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र ऊन-सावल्याचा खेळ सध्या सुरू आहे. तसेच आकाशात ढग दिसून येतात, अशा अवस्थेत शेतकरी पाण्याची आस धरून असतो. मात्र वरुणराजाची अवकृपा दिसून येत असल्याने शेतकरी चिंतातुर झालेला दिसून येत आहे. रोवणी हंगाम सुरू असलेल्या कालावधीत शेत शिवारात अजूनही पाण्याचा साठा दिसून येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. काही शेतकऱ्यांचे धान पऱ्हे रोवणीलायक झाले आहेत. मात्र पाण्याअभावी रोवणी काम रखडल्याचे दिसून येत आहे.
शेतकरी रोवणी झाल्यावर वाढीसाठी रासायनिक खतांची मात्रा पिकाला देत असतात अशा अवस्थेत धानपिकाच्या जमिनीत पाणी असणे आवश्यक असते. मात्र काही शेतात टाकलेले खतसुद्धा विरघळले नसल्याने रासायनिक खत जसेच्या तसे दिसून येत आहे. त्यामुळे पाण्याअभावी खताचा खर्च वाया गेला आहे.
बाॅक्स...
लागवडीचा खर्च माथ्यावर बसला
शेतजमीन नाल्याशेजारी असून, नाल्यातील साचलेल्या पाण्याचा उपयोग करून दहा दिवसांपूर्वी रोवणीचे काम पूर्ण केले. यासाठी १५ ते २० हजार चार एकर शेतीजमिनीला खर्च झाले आहे, असे कान्हाेली येथील एका शेतकऱ्याने सांगितले. रोवणीनंतर पाऊस आला नाही. त्यामुळे पीक वाचवण्यासाठी मोठी अडचण जात असून, पीक हातून जाण्याचे संकेत दिसून येत आहे.
200721\img-20210720-wa0199.jpg
पाण्याअभावी रोहिणी झालेल्या शेतीतील पडलेल्या भेगा फोटो