जिल्हा सोमवारपासून हाेणार अनलॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 05:00 IST2021-06-06T05:00:00+5:302021-06-06T05:00:33+5:30
कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यानंतर गेल्या १ जूनपासून जिल्ह्यात लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आले होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांना आठवड्यातून दोन दिवस उघडण्याची परवानगी मिळाली होती. पण सलून, ब्युटी पार्लरला अजूनही परवानगी नसल्यामुळे त्या व्यावसायिकांना कठीण दिवसांना सामोरे जावे लागत होते. आता सोमवारपासून त्यांनाही दिलासा मिळणार आहे. गडचिरोली जिल्हा तिसऱ्या लेव्हलला आला आहे.

जिल्हा सोमवारपासून हाेणार अनलॉक
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या १५ एप्रिलपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये येत्या सोमवारपासून (दि. ७) बरीच शिथिलता दिली जाणार आहे. गडचिरोली जिल्हा कोरोनाच्या बाबतीत तिसऱ्या स्तरावर असल्यामुळे सोमवार ते शुक्रवार यादरम्यान दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाणार आहे. त्याबाबतच्या सविस्तर सूचना देणारा आदेश रविवारी काढणार असल्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यानंतर गेल्या १ जूनपासून जिल्ह्यात लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आले होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांना आठवड्यातून दोन दिवस उघडण्याची परवानगी मिळाली होती. पण सलून, ब्युटी पार्लरला अजूनही परवानगी नसल्यामुळे त्या व्यावसायिकांना कठीण दिवसांना सामोरे जावे लागत होते. आता सोमवारपासून त्यांनाही दिलासा मिळणार आहे. गडचिरोली जिल्हा तिसऱ्या लेव्हलला आला आहे. स्थिती सुधारल्यास बंधने अजून कमी हाेतील.
१ पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सीजन बेडवर रूग्ण उपचार घेत असतील तर तो भाग पहिल्या स्तरात येईल.
२ पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के आणि २५ ते ४० टक्के ऑक्सीजन बेडवर रूग्ण उपचार घेत असतील तर तो भाग दुसऱ्या स्तरात येईल.
३ पॉझिटिव्हिटी रेट ५ ते १० टक्के आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सीजन बेडवर रूग्ण उपचार घेत असतील तर तो भाग तिसऱ्या स्तरात येईल.
४ पॉझिटिव्हिटी रेट १० ते २० टक्के आणि ६० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सीजन बेडवर रूग्ण उपचार घेत असतील तर तो भाग चौथ्या स्तरात येईल.
५ पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांपेक्षा अधिक आणि ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सीजन बेडवर रूग्ण उपचार घेत असतील तर तो भाग पाचव्या स्तरात येईल.
कायम बंद राहील?
संध्याकाळी ५ ते सकाळी ७ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू राहील. त्यामुळे अत्यावश्यक कामे वगळता कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही.
लेव्हल-५ मध्ये असलेल्या जिल्ह्यातून किंवा दुसऱ्या राज्यातून येण्यासाठी ई-पास घ्यावी लागेल. उर्वरित जिल्ह्यातून येण्यासाठी पासची गरज राहणार नाही.
मॉल, सिनेमागृह आणि पानठेले आदी उघडण्यास अद्याप परवानगी राहणार नाही. भविष्यात स्थिती सुधारल्यास त्याला परवानगी मिळू शकेल.
काय सुरू राहील?
- सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आठवड्याचे सर्व दिवस सुरू राहतील.
- अत्यावश्यक सेवेतील वगळून इतर दुकाने सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत पण केवळ सोमवार ते शुक्रवार सुरू राहतील.
- रेस्टॉरेंट, खानावळीत सोमवार ते शुक्रवार ५० टक्के उपस्थितीत बसून नाश्ता, जेवण करण्याची परवानगी.
- सकाळी ७ ते ९ पर्यंत सकाळी फिरायला जाण्यास परवानगी असेल, तसेच क्रीडांगणावर सकाळ-संध्याकाळ खेळता येईल.
- ५० लोकांच्या मर्यादेत लग्न किंवा इतर कार्यक्रम घेता येईल. अंत्यसंस्कारासाठी मात्र २० ची मर्यादा कायम राहील.
- आंतरजिल्हा जाण्यासाठी आता ई-पासची गरज पडणार नाही. एसटी बसेस १०० टक्के क्षमतेने सुरू राहतील.
लॉकडाऊनमध्ये बऱ्याच प्रमाणात शिथिलता देण्याचा निर्णय झाला आहे. रविवारी त्याबाबतचा आदेश काढला जाईल. दर आठवड्याला स्थितीचा आढावा घेऊन परिस्थितीनुसार निर्बंध अजून शिथिल करायचे, की आणखी कडक करायचे याचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे नागरिकांनी बिनधास्तपणे न वागता स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करावी. - दीपक सिंगला, जिल्हाधिकारी