जीवनदायी योजनेत जिल्हा अव्वल स्थानावर
By Admin | Updated: November 29, 2014 23:20 IST2014-11-29T23:20:33+5:302014-11-29T23:20:33+5:30
गरीब नागरिकांना खासगी तसेच शासकीय रूग्णालयात मोफत उपचार मिळावे यासाठी शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत दोन वर्षात सुमारे

जीवनदायी योजनेत जिल्हा अव्वल स्थानावर
गडचिरोली : गरीब नागरिकांना खासगी तसेच शासकीय रूग्णालयात मोफत उपचार मिळावे यासाठी शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत दोन वर्षात सुमारे १ हजार ७६० रूग्णांवर उपचार करण्यात आले असून गडचिरोली जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.
राजीव गांधी जीवनदायी योजना राज्यात २ जुलै २०१२ रोजी सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ही योजना अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, रायगड, वर्धा व मुंबई या ९ जिल्ह्यांमध्ये सुरू केली. त्यानंतर ही योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित करण्यात आली. सद्य:स्थितीत ही योजना ३६ जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. या योजनेंतर्गत ९०० पेक्षा अधिक रोगांवर मोफत उपचार करण्यात येते. या योजनेचा लाभ पीवळा रेशन कार्ड, अंत्योदय व केशरी कार्डधारकांना दिल्या जातो. या योजनेंतर्गत दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे १ हजार ७६० रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यावर ९४ लाख ६१ हजार २०० रूपये खर्च झाले आहेत.
राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ तळागाळातील प्रत्येक रूग्णाला मिळावा यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय व जिल्हा सामान्य रूग्णालयात आरोग्य मित्र नेमण्यात आले आहेत. हे आरोग्य मित्र रूग्णांना उपचारासाठी योग्य मार्गदर्शन करण्याबरोबरच योजनेबाबत जनजागृती करीत आहेत. त्यामुळेच गडचिरोली जिल्हा नक्षलप्रभावित व मागास असला तरीही सर्वाधिक लाभ रूग्णांना मिळाला आहे.
जीवनदायी योजनेंतर्गत केवळ जिल्हा सामान्य रूग्णालय हे एकमेव सलग्नीत असलेले रूग्णालय आहेत. त्यामुळे शेकडो किमी अंतर पार करून नागरिकांना या रूग्णालयात उपचारासाठी यावे लागते. जिल्ह्यातील उपजिल्हा रूग्णालयेसुध्दा जीवनदायी योजनेसोबत जोडल्यास रूग्णांना अधिक सोयीचे होण्यास मदत होणार आहे. (नगर प्रतिनिधी)