दहशतवादाची झळ सोसलेला जिल्हा
By Admin | Updated: May 21, 2015 01:49 IST2015-05-21T01:49:42+5:302015-05-21T01:49:42+5:30
भारताचे माजी पंतप्रधान व या देशाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाकडे घेऊन जाणारे एक तरूण नेतृत्व दिवंगत राजीव गांधी यांची पुण्यतिथी दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळला जातो.

दहशतवादाची झळ सोसलेला जिल्हा
गडचिरोली : भारताचे माजी पंतप्रधान व या देशाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाकडे घेऊन जाणारे एक तरूण नेतृत्व दिवंगत राजीव गांधी यांची पुण्यतिथी दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. देशात गेल्या अनेक वर्षांपासून विविध भागाला दहशतवादाने व्यापलेले आहे. आता ही समस्या आंतरराष्ट्रीय झाली असली, तरी महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्याला नक्षलवादाने ग्रासले आहे. नक्षली दहशतवादामुळे या जिल्ह्याच्या विकासावर परिणाम झाला आहे. अनेक कुटुंब या दहशतवादाने पीडित झाले आहेत. यावर तोडगा निघावा याकरिता आता सरकारने कायम उपाययोजन करायला हवी, अशी भावना नागरिक व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे दहशतवादविरोधी दिवसाच्या निमित्ताने सर्वांनी नक्षलमुक्त व दहशतमुक्त गाव, जिल्हा, देश अशी प्रतिज्ञा करायला हवी.
स्वातंत्र्यानंतर देशात अनेक दहशतवादी हल्ले झालेत. या हल्ल्यात देशातील दोन पंतप्रधानही मारले गेले. दहशतवाद, नक्षलवाद यांचा मुकाबला करतांना अनेक जवानांना आपल्या प्राणांची आहूती द्यावी लागली. देशातील दहशतवाद कायम निपटून काढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. मात्र अजूनही काही आंतरबाह्य शक्ती या देशाला अस्थिर करण्यासाठी दहशतवादी हल्ले करून आपला अस्तीत्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या काही वर्षात देशातील सात ते आठ राज्यांमध्ये नक्षलवादाची नवी समस्या निर्माण झाली आहे. नक्षलवाद्यांचा हिंसाचार हा ही दहशतवादाचाच एक भाग आहे. गडचिरोली जिल्हा हा या दहशतवादाने प्रचंड होरपळून निघाला आहे.
१९८० च्या दशकात या जिल्ह्यात नक्षली कारवायांना सुरूवात झाली. आंध्रप्रदेश मार्ग गडचिरोली जिल्ह्याच्या अरण्य प्रदेशात नक्षलवाद्यांचे पाळेमुळे रोवले जाऊ लागले. गेल्या ३० - ४० वर्षात जिल्ह्यातील नक्षली दहशतवादाने उग्ररूप धारण केले आहे. आतापर्यंत १५० वर अधिक पोलीस जवान या नक्षली हल्ल्यात शहीद झाले. तर ४५२ वर अधिक नागरिक नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात बळी पडले. अनेक कुटुंबांना या हिंसाचाराच्या झळा पोहोचल्या.
कुणाचा बाप, भाऊ, कुणाचा मुलगा तर कुणाची मुलगी, आई, पत्नी या हिंसाचारात मारल्या गेले. मात्र या सर्व हिंसाचाराचा विरोध करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस दल सक्षमतेने काम करीत आहे. हा जिल्हा नक्षली दहशतवादातून मुक्त करण्याची प्रतिज्ञा २१ मे रोजी सर्व जिल्हावासीयांनी करण्याची गरज आहे. अनेक गावांनी नक्षलवाद्यांना गाव बंदी करून याची सुरूवात केली आहे. हिंसाचार हा कुठल्याही स्वरूपाचा असो त्याचा विरोध प्रखरपणे झाला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने दहशतवाद विरोधी दिन साजरा करण्यामागचा उद्देश यशस्वी होईल, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. (जिल्हा प्रतिनिधी)