जिल्हा पोलीस अधीक्षक पोहोचले नक्षल कुटुंबांच्या घरी
By Admin | Updated: December 5, 2015 09:07 IST2015-12-05T09:07:28+5:302015-12-05T09:07:28+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा परिसरातील अर्कापल्ली येथील नक्षल कुटुंबाला गुरूवारी भेट देऊन त्यांना आत्मसमर्पण योजनेचे महत्त्व पटवून दिले.

जिल्हा पोलीस अधीक्षक पोहोचले नक्षल कुटुंबांच्या घरी
समस्या जाणल्या : आत्मसमर्पण योजनेचे महत्त्व दिले पटवून
गडचिरोली : जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा परिसरातील अर्कापल्ली येथील नक्षल कुटुंबाला गुरूवारी भेट देऊन त्यांना आत्मसमर्पण योजनेचे महत्त्व पटवून दिले. त्याचबरोबर त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.
गडचिरोली पोलीस विभागाने नवजीवन अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत नक्षल कुटुंबाला भेट देऊन त्यांना आत्मसमर्पण योजनेचे फायदे समजावून सांगितले जात आहेत. याची माहिती कुटुंबातील सदस्य संबंधित नक्षल्याला देतील व आत्मसमर्पणाचे प्रमाण वाढेल हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी तर अर्कापल्ली येथील बालान्ना ऊर्फ चंद्रशेखर पोचा सडमेक व वासुदेव ऊर्फ नंदू बुच्चा आत्राम यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी बालान्नाचे दोन भाऊ, पत्नी व मुले उपस्थित होती. बालान्ना हा १९८१-८२ मध्ये नक्षल दलममध्ये भरती झाला. तो ६५ वर्षांचा आहे. तो स्वत:हूनच नक्षल दलममध्ये निघून गेला, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. सध्या बालान्ना हा छत्तीसगड राज्यात जनताना सरकार इनजार्च तसेच डीव्हीसी मेंबर आहे.
अर्कापल्ली येथीलच वासुदेव आत्राम हा अहेरी दलम इन्जार्च आहे. पोलीस अधीक्षकांनी भेट दिली तेव्हा त्याची आई-वडील, बहीण व मनोरूग्ण भाऊ तसेच गावातील नागरिक उपस्थित होते. वासुदेव हा २००५ मध्ये नक्षल दलममध्ये दाखल झाला. बारावी विज्ञान शाखेतून त्याने शिक्षण घेतले होते. त्याला पशुवैद्यकीय अधिकारी व्हायचे होते. परंतु आपण त्याला पैसे दिले नाही. त्यामुळे तो घरून भांडण करून नक्षल दलममध्ये निघून गेला, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. दोन्ही कुटुंबांना पोलीस अधीक्षकांनी आत्मसमर्पण योजनेची माहिती दिली व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. मनोरूग्ण भावाच्या उपचाराची जबाबदारी जिल्हा पोलीस दलाने उचलली आहे. कुटुंबीयांना भेट वस्तू दिल्या. गावकऱ्यांसोबतही विविध मुद्यांवर चर्चा केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)