जिल्हा कौशल्य विकास रोजगार मार्गदर्शन केंद्र वाऱ्यावर
By Admin | Updated: June 16, 2016 02:07 IST2016-06-16T02:07:16+5:302016-06-16T02:07:16+5:30
कौशल्य विकास कार्यक्रम राबवून बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम देशभरात होत असताना गडचिरोली येथील

जिल्हा कौशल्य विकास रोजगार मार्गदर्शन केंद्र वाऱ्यावर
अधिकाऱ्यांचे पद रिक्त : कार्यालयीन वेळेत कर्मचारी गैरहजर
गडचिरोली : कौशल्य विकास कार्यक्रम राबवून बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम देशभरात होत असताना गडचिरोली येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र दररोज उघडले जाते. परंतु सदर कार्यालयात कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित राहत असल्याने कार्यालय वाऱ्यावर असल्याचे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दिलेल्या भेटीत आढळून आले.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राला युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली असता, केवळ तीन कर्मचारी उपस्थित असल्याचे आढळून आले. जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात अनेक युवक कौशल्य विकास तसेच रोजगाराबाबत माहिती जाणून घेण्याकरिता येत असतात. परंतु येथे अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळत उपस्थित राहत नाही. त्यामुळे युवकांना आल्यापावली परतावे लागते.
या कार्यालयातील रिक्तपदे भरण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने या कार्यालयातील वर्ग करण्यात आलेले आदेश रद्द करून कार्यालयात पूर्ववत गडचिरोली येथील कार्यालयात अधिकारी व लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांना आदेशित करावे, तसेच रिक्तपदे भरण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, महेंद्र ब्राम्हणवाडे, रजनीकांत मोटघरे, अमोल भडांगे, प्रतीक बारसिंगे यांनी केली आहे.
मागणी मान्य न झाल्यास युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)