जि. प. अध्यक्षांना अटक करा
By Admin | Updated: October 26, 2015 01:23 IST2015-10-26T01:23:52+5:302015-10-26T01:23:52+5:30
मुलचेरा तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संभाषण करून ...

जि. प. अध्यक्षांना अटक करा
अन्यथा आंदोलन छेडणार : आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांची मागणी
गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संभाषण करून जातीवाचक शिवीगाळ व पदाला न शोभणारी अभद्र चर्चा केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांच्या विरूद्ध आष्टी पोलीस ठाण्यात विनयभंग व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आष्टी पोलिसांनी त्यांना अद्यापही अटक केलेली नाही. त्यांना अटक करण्यास आष्टी पोलीस टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप करीत जि. प. अध्यक्षांना तत्काळ अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
या पत्रकार परिषदेला आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनचे गडचिरोलीे अध्यक्ष भरत येरमे, सरचिटणीस सदानंद ताराम, कार्याध्यक्ष माधव गावड, कोषाध्यक्ष आनंद कंगाले, भय्यालाल येरमे, रोशन मसराम, सुरेश किरंगे, अशोक गोटा व पीडित महिला डॉक्टरचे पती राकेश चांदेकर आदी उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना भरत येरमे म्हणाले, जि. प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांनी एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला दमदाटी करून कारवाईची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी पुन्हा रात्री भ्रमणध्वनीवर त्यांच्याशी अश्लिल संभाषण केले व त्यांना मानसिक त्रास दिला. त्यामुळे महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, एका आदिवासी महिला अधिकाऱ्यांविरूद्ध जि. प. अध्यक्ष कुत्तरमारे यांनी केलेले वर्तन निंदनीय व पदाला न शोभणारे आहे. यासंदर्भात महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी जि. प. अध्यक्ष कुत्तरमारे यांच्यावर विनयभंग व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र आष्टी पोलीस त्यांना अटक करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. याप्रसंगी पीडित महिला वैद्यकीय अधिकारी यांचे पती राकेश चांदेकर यांनी सांगितले की, १९ आॅक्टोबर रोजी कोर्टात समन्स असल्यामुळे हजर राहण्यासाठी महिला वैद्यकीय अधिकारी या गडचिरोलीला आल्या होत्या. २० आॅक्टोबरला त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्यावर गेल्या. दरम्यान जि. प. अध्यक्ष कुत्तरमारे यांनी केंद्राला भेट दिली. गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, तसे त्यांना पत्र द्या, असे महिला डॉक्टरांना बजाविले. त्यानंतर कुत्तरमारे यांचा पुन्हा फोन आला. मात्र रुग्ण असल्यामुळे नंतर फोन करते, असे सांगून महिला डॉक्टरांनी फोन ठेवला. त्यानंतर रात्री ९.२१ वाजता पुन्हा महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी फोन केला. यावेळी त्यांनी त्यांच्याशी अभद्र भाषेत चर्चा केली. त्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना भेटलो. जिल्हाधिकारी यांनी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार आम्ही तक्रार दाखल केली. या प्रकरणामुळे आम्ही प्रचंड मानसिक तणावात आहोत, असेही चांदेकर यांनी यावेळी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)