जि. प. चे ६६ कोटी गेले परत
By Admin | Updated: September 11, 2015 01:49 IST2015-09-11T01:49:39+5:302015-09-11T01:49:39+5:30
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना आतापर्यंत कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त झाला.

जि. प. चे ६६ कोटी गेले परत
डीपीसीची सभा : पाच महिन्यांत केवळ ६५ टक्के निधी खर्च
गडचिरोली : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना आतापर्यंत कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त झाला. यापैकी खर्चाअभावी तब्बल ६६ कोटींचा निधी परत गेला असल्याचा मुद्दा बुधवारच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत गाजला. यावर्षी प्राप्त निधीतून जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांनी आॅगस्ट अखेरपर्यंत केवळ ६५ टक्के निधी खर्च झाला असल्याची माहिती जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी सभेत दिली.
जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला निधी खर्चाअभावी परत जाऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे विविध शासकीय योजना राबविण्यासाठी तसेच विकास कामे करण्यासाठी अडचण जात आहे, असे संपदा मेहता यांनी सांगितले. यावर जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी यासंदर्भात सभेने ठराव घ्यावा, असे सांगितले. यासंदर्भात पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी तसा ठराव घेण्यास मान्यता प्रदान केली.
जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करताना भेदभाव होऊ नये, सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश दिला जावा, असा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. चामोर्शीतील जिल्हा परिषद शाळेला १०० वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने एक विशेष कार्यक्रम घेण्यात यावा, अशी सूचना खा. अशोक नेते यांनी सभेत केली. चामोर्शी जि. प. शाळेला नव्या इमारतीची गरज आहे. तसेच जिल्ह्यातील जि. प. शाळांच्या इमारतींचा आढावा घेण्यात यावा, असेही नेते यावेळी म्हणाले. कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या जिल्हा परिषद शाळा, इमारतींच्या जागी नव्या इमारतीचा प्रस्ताव ठेवून यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्याचे सभेत ठरविण्यात आले. शाळा इमारत बांधकामासाठी वेगळे लेखाशिर्ष निर्माण करून त्यासाठी निधी देण्याचा ठराव पालकमंत्री आत्राम यांच्या सूचनेवरून घेण्यात आला. नव्या शाळा इमारत बांधकामासाठी स्वतंत्र निधी उभारण्याची मागणी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट यांनी सभेत लावून धरली होती. या सभेला खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधींसह अनेक विभागप्रमुख उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
सिरोंचा ग्रामीण रुग्णालयाच्या मुद्यावर चर्चा
सिरोंचाच्या ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर यंत्राचा अभाव आहे. यामुळे या रुग्णालयात दाखल असलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला. या मुद्यावर पालकमंत्री आत्राम यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आरोग्याची समस्या गंभीर आहे, असेही ते यावेळी म्हणाले. जिल्हा शल्यचिकित्सकांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांना वारंवार भेटी देऊन वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यात मलेरिया रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी क्षेत्रात डासांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मच्छरदाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव सभेत मांडण्यात आला. राज्य मलेरिया नियंत्रण समितीमार्फत जिल्ह्याला यंदा केवळ १३ हजार मच्छरदाणीचा पुरवठा झाला असल्याची माहिती सभेत देण्यात आली. जि. प. आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात उपकेंद्रांच्या इमारत बांधकासाठी २०१५-१६ या चालू वर्षात ३ कोटी २२ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सदर संपूर्ण रक्कम खर्च करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांनी सभेत दिली.