जिल्हा रुग्णालय फुल्ल

By Admin | Updated: October 2, 2015 06:05 IST2015-10-02T06:05:58+5:302015-10-02T06:05:58+5:30

वातावरणातील बदलामुळे मागील १५ दिवसांपासून जिल्हाभरात तापाची साथ पसरली आहे. त्यामुळे जिल्हा

District Hospital Full | जिल्हा रुग्णालय फुल्ल

जिल्हा रुग्णालय फुल्ल

गडचिरोली : वातावरणातील बदलामुळे मागील १५ दिवसांपासून जिल्हाभरात तापाची साथ पसरली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या अचानक दीडपटीने वाढली आहे. २५० खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयात ५०० रुग्ण उपचार घेत आहेत. तर बाह्यरुग्ण विभागात दरदिवशी जवळपास ७०० रुग्णांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागात नोंदणी करण्यापासून ते तपासणी, औषध घेण्यासाठी रुग्णांची भलीमोठी रांग लागली असल्याचे दिसून येत आहे.
गडचिरोली येथे असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाभरातील रुग्ण दाखल होतात. त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, मूल, सावली, गोंडपिपरी या तालुक्यांमधीलही रुग्ण गडचिरोली येथेच उपचारासाठी येतात. त्यामुळे या रुग्णालयात नेहमीच गर्दी राहते. मात्र वातावरणातील बदलामुळे मागील १५ दिवसांपासून रुग्णालयात रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. रुग्णांचे जत्थे उपचारासाठी दाखल होत आहेत.
दमट वातावरणामुळे डासांची पैदास वाढून प्रामुख्याने मलेरिया, डेंग्यू या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. तर पावसाळ्यातील दूषित पाण्यामुळे अतिसार, टायफाईड, पिलिया आदी रोगांचे सुद्धा रुग्ण वाढले आहेत. बाह्यरुग्ण विभागाची वेळ सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत असले तरी वाढलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे २ ते ३ वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभाग सुरू राहत आहे. चिठ्ठी काढण्यापासून ते तपासणी करण्यापर्यंत रुग्णांची रांग लागत असल्याने रुग्णांना तासणतास रांगेत उभे राहावे लागत आहे. वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात धानाचे पीक घेतले जाते. धानाच्या बांधीत पाणी साचून राहत असल्याने डासांची पैदास या कालावधीत वाढत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालय, मोठ्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र व आरमोरी, कुरखेडा, अहेरी येथे उपजिल्हा रुग्णालय असले तरी या रुग्णालयांमध्ये पाहिजे त्या सुविधा उपलब्ध नाहीत. बहुतांश रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नाहीत, त्यामुळे रुग्णाची थोडीही गंभीर स्थिती लक्षात आल्यास तेथील डॉक्टरांकडून रेफर टू गडचिरोलीचा सल्ला रुग्णाला दिला जातो. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. जिल्हा रूग्णालयावरील भार कमी होण्यासाठी ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालयात सोयीसुविधा असणे आवश्यक आहे. (नगर प्रतिनिधी)
२५० क्षमतेच्या रुग्णालयात ५०० रुग्ण
जिल्हा सामान्य रुग्णालयाची क्षमता जवळपास २५० खाटांची आहे. तरीही या रुग्णालयात सध्य:स्थितीत ५०० पेक्षा अधिक रुग्ण भरती होऊन उपचार घेत आहेत. २८ सप्टेंबर रोजी रुग्णालयात ५१४, २९ सप्टेंबर रोजी ५२३ व ३० सप्टेंबर रोजी ५०८ रुग्ण उपचार घेत होते. अनेक रुग्णांना खाली गादी टाकून उपचार घ्यावे लागत आहेत. २५ ते ३० सप्टेंबरदरम्यान बाह्यरुग्ण विभागात ३ हजार ५४४ रुग्णांची नोंदणी करण्यात आली.

उघड्यावरचे अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे व दूषित पाण्यामुळे अतिसार, टायफाईड, पिलिया आदी रोग होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे उघड्यावरचे अन्नपदार्थ खाण्याचे टाळावे, घर व परिसरात स्वच्छता बाळगावी, घराजवळ नाली किंवा सांडपाणी असल्यास त्यामध्ये डास मरणाऱ्या औषधांची फवारणी करावी, घरातील पाणी आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस साचून ठेवू नये, हात धुतल्यानंतरच अन्नपदार्थ सेवन करावे.
- डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली

रुग्णालयात दाखल रुग्ण
महिनाओपीडीआयपीडी
एप्रिल१०,७६४२,१४७
मे११,३७५२,२९८
जून१२,१९८२,२२०
जुलै१३,७९६२,४६६
आॅगस्ट१३,९६०२,५९७
सप्टेंबर१५,०८३४,२९०

स्त्री रुग्णालय सुरू झाले असते तर जिल्हा सामान्य रुग्णालयावरील भार कमी होण्यास फार मोठी मदत झाली असती. सदर रुग्णालय डिसेंबरमध्ये सुरू होईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.

Web Title: District Hospital Full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.