गुणवत्तेत जिल्हा अग्रस्थानी
By Admin | Updated: February 2, 2017 01:29 IST2017-02-02T01:29:53+5:302017-02-02T01:29:53+5:30
गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी ते शिक्षणाधिकारी असा प्रवास करत सलग ३० वर्ष सेवा देऊन सेवानिवृत्त होत असताना

गुणवत्तेत जिल्हा अग्रस्थानी
शिक्षण विभागातर्फे कार्यक्रम : निरोप समारंभात माणिक साखरे यांचे प्रतिपादन
गडचिरोली : गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी ते शिक्षणाधिकारी असा प्रवास करत सलग ३० वर्ष सेवा देऊन सेवानिवृत्त होत असताना शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाप्रति समाधानी आहे. जून २०१५ पासून शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आपण सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्याला राज्यात गुणवत्तेत अग्रस्थानी नेऊन ठेवले. वरिष्ठांकडून याची दखल घेण्यात आली. ही दखल आपल्या कामाची पावती आहे, असे उद्गार सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माणिक साखरे यांनी केले.
सर्व शिक्षा अभियान प्रशिक्षण विभागाच्या वतीने शिक्षणाधिकारी साखरे यांचा सेवानिवृत्ती सत्कार मंगळवारी करून त्यांना निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी साखरे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम होते. यावेळी सत्कारमूर्ती माणिक साखरे, रेखा साखरे, निशिगंधा साखरे, डायटचे प्राचार्य डॉ. रवींद्र रमतकर, उपशिक्षणाधिकारी एम. एन. चलाख, गटशिक्षणाधिकारी उद्धव डांगे, बारेकर, प्रकाश दुर्गे, विक्रम गिरे उपस्थित होते. कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी माणिक साखरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात डिसेंबर अखेरपर्यंत ६४९ शाळा १०० टक्के प्रगत करण्यात आल्या. १६० शाळा डिजिटल तर मागील वर्षी संपूर्ण जिल्ह्यातील शाळा मोबाईल डिजिटल करण्यात आल्या. लोकवर्गणीतून १७ लाख ७१ हजार ७५० रूपये जिल्ह्यातील शाळांमध्ये जमा झाले. १०० टक्के आदिवासी व दुर्गम भाग असतानाही अनेक समस्यांना तोंड देत शाळा डिजिटल करण्यात आल्या. याकरिता शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, पालक प्रतिनिधी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले, असे प्रतिपादन माणिक साखरे यांनी केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. रमतकर, उपशिक्षणाधिकारी चलाख, बीईओ उद्धव डांगे, प्रकाश दुर्गे, प्रफुल मेश्राम, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन उपशिक्षणाधिकारी यू. एन. राऊत तर आभार उपशिक्षणाधिकारी राजू आकेवार यांनी मानले. (प्रतिनिधी)