समन्वयातून जिल्हा विकास साधा
By Admin | Updated: August 14, 2016 01:35 IST2016-08-14T01:35:36+5:302016-08-14T01:35:36+5:30
गडचिरोली जिल्ह्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. प्रशासनात आवश्यक मनुष्यबळ नसल्यामुळे योजना राबविताना अडचणीत आहेत.

समन्वयातून जिल्हा विकास साधा
अशोक नेते यांच्या सूचना : समन्वय समितीची सभा
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. प्रशासनात आवश्यक मनुष्यबळ नसल्यामुळे योजना राबविताना अडचणीत आहेत. मात्र या अडचणीवर मात करून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन कामे करावीत, समन्वय व सकारात्मकतेतून जिल्ह्याचा विकास साधावा, अशा सूचना खा. अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हा विकास समन्वय समितीची पहिली सभा शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. या सभेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, आ. डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, माजी जि. प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवने आदी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या विविध योजना गडचिरोली जिल्ह्यात राबविल्या जात आहेत. या योजनातून विकास कामे करण्यास अनेक भौगोलिक अडचणी आहेत. मात्र या अडचणीवर मात करून पुढे जाण्याची गरज आहे, असे खासदार नेते म्हणाले. जिल्ह्याच्या पेसा अंतर्गत गावांमध्ये वनहक्क पट्ट्याची कामे योग्यरित्या सुरू आहे. विविध योजनातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे खासदार नेते यांनी सांगितले. या सभेत विविध योजना व विकासाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)