रेतीची तस्करी करणारे पाच ट्रक जिल्हाधिकाऱ्यांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2016 01:17 IST2016-08-27T01:17:34+5:302016-08-27T01:17:34+5:30

सिरोंचा तालुक्याच्या भेटीवर अचानक गेलेले गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी टीपीपेक्षा अधिक रेतीची वाहतूक करणारे पाच ट्रक

District collectors seized five trucks smuggling | रेतीची तस्करी करणारे पाच ट्रक जिल्हाधिकाऱ्यांनी पकडले

रेतीची तस्करी करणारे पाच ट्रक जिल्हाधिकाऱ्यांनी पकडले

सिरोंचा : सिरोंचा तालुक्याच्या भेटीवर अचानक गेलेले गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी टीपीपेक्षा अधिक रेतीची वाहतूक करणारे पाच ट्रक पकडल्याची कारवाई शुक्रवारी सिरोंचा येथे केली. सदर पाचही ट्रक सुरुवातीला सिरोंचाच्या तहसील कार्यालयात आणण्यात आले. त्यानंतर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
रेती तस्करी प्रकरणी जप्त करण्यात आलेल्या ट्रकांमध्ये टीएस-१५-यूबी-१८१८, टीएस-१५-यूबी-१८९९, टीएस-०५-यूबी-५८५९, एपी-२९-डब्ल्यू-२५२९ व टीएस-१५-यूबी-३९६९ या क्रमांकाच्या ट्रकांचा समावेश आहे. या कारवाईसंदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी नायक यांनी सांगितले की, रेतीची अवैधरित्या वाहतूक व तस्करी नेहमीच होत असल्याबाबतच्या तक्रारी माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत. वृत्तपत्रातूनही यासंदर्भात बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्यामुळे मी सिरोंचाला येत असताना आढळलेल्या ट्रकांची तपासणी केली. यात टीपीपेक्षा अधिक रेतीची वाहतूक होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर ट्रक पुढील कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयात आणण्यात आले. शासनाच्या व प्रशासनाच्या अटी व शर्तीचे उल्लंघन होत असल्याचे या प्रकरणात दिसून आल्यास संबंधितांवर निश्चितच कारवाई करू, असे जिल्हाधिकारी नायक यावेळी म्हणाले. रेतीने भरलेल्या सदर पाचही ट्रकांचे सिरोंचा येथील तलाठी व नायब तहसीलदारांकडून मोजमाप करण्यात येत होते.
यासंदर्भात माहिती देताना तहसीलदार अशोक कुमरे म्हणाले, ट्रक चालकांकडे रेती वाहतुकीचा परवाना आहे, परंतु परवान्यापेक्षा दोन ते तीन ब्रास रेतीची अधिक वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आले. सतर्कता म्हणून पकडलेले सदर पाचही ट्रक सिरोंचा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. यावेळी सदर पाचही ट्रककडून १ लाख ८१ हजार ९२६ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. ट्रकचालकांमध्ये जी. राजू, के. सुरेश, डी. चंद्रम, व्ही. पांडू, एम. शंकर यांचा समावेश आहे. ही सर्व रेती तेलंगणा राज्यात जात होती. (शहर प्रतिनिधी)

Web Title: District collectors seized five trucks smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.