जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक एटापल्लीत पोहोचले
By Admin | Updated: February 19, 2017 01:09 IST2017-02-19T01:09:25+5:302017-02-19T01:09:25+5:30
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक एटापल्लीत पोहोचले
एटापल्ली : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारी रोजी अहेरी उपविभागातील चार तालुक्यात मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी एटापल्ली येथे निवडणूक पूर्व तयारीचा आढावा घेतला.
एटापल्ली हा अहेरी उपविभागातील संवेदनशील तालुका आहे. अहेरी उपविभागात चार तालुक्यात १६ जिल्हा परिषद व ३२ पंचायत समिती गणासाठी निवडणूक होत आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक दुपारी २ वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टरने एटापल्ली येथे पोहोचले. त्यांच्या समावेत प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाचे अप्पर पोलीस अधीक्षक डी. राजा, उपविभागीय पोलीस अधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी एटापल्ली येथील उपविभागीय कार्यालयात निवडणूक कामाबाबत अर्धा तास बैठक घेतली. यावेळी एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विपीन इटनकर, सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार संपत खलाटे, एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी नितीन जाधव, ठाणेदार शिवाजी राऊत आदी उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल मंडळ कार्यालयातील मतमोजणी होणार असलेल्या जागेची पाहणीही केली. त्यानंतर परत ते उपविभागीय अधिकारी कार्यालयात गेले. येथे त्यांनी एटापल्ली तालुक्यातील निवडणूक केंद्र व सुरक्षा विषयक बाबी यांच्याबाबत माहितीही जाणून घेतली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही निवडणूक कामाबाबतची माहिती जाणली. (तालुका प्रतिनिधी)