बालिका विद्यालयातील उपक्रमांचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक
By Admin | Updated: January 9, 2016 01:58 IST2016-01-09T01:58:38+5:302016-01-09T01:58:38+5:30
दैनंदिन शिक्षणाबरोबरच विद्यार्थिनींच्या सर्वांगिण विकासासाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय भामरागडच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

बालिका विद्यालयातील उपक्रमांचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक
भामरागड येथील शाळा : विद्यार्थिनींनी घेतले व्यावसायिक शिक्षण
भामरागड : दैनंदिन शिक्षणाबरोबरच विद्यार्थिनींच्या सर्वांगिण विकासासाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय भामरागडच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांचे जिल्हाधिकारी रणजीतकुमार व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी कौतुक केले आहे.
शाळाबाह्य मुलींची शाळा म्हणून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाची ओळख आहे. मागील वर्षी या शाळेचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ९२ टक्के एवढा लागला. विद्यार्थिनींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी व्यावसायिक शिक्षणही या विद्यालयात दिले जाते. व्यावसायिक शिक्षणाअंतर्गत बांबूचे साहित्य तयार करून त्याची बाजारपेठेत विक्री करणे याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. जिल्हा व्यवस्थापन समितीची सभा सोमवारी पार पडली. या सभेदरम्यान उपक्रमांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. सदर उपक्रम जाणून जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. त्याचबरोबर मुख्याध्यापिका एम. बी. मोडपल्लीवार, तहसीलदार अरूण येरचे, गटशिक्षणाधिकारी एम. के. दरडमारे यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सत्कार केला. यावेळी उपशिक्षणाधिकारी राऊत, जिल्हा समन्वयक लता चौधरी, कार्यकारी अभियंता भरडकर यांच्यासह सर्व समित्यांचे सदस्य उपस्थित होते.