जिल्हा बँकेत नोटबंदीने ग्रामीण भाग अडचणीत
By Admin | Updated: November 16, 2016 01:59 IST2016-11-16T01:59:25+5:302016-11-16T01:59:25+5:30
चलनातून बाद झालेल्या १००० आणि ५०० च्या नोटा स्वीकारण्यास देशभरातील जिल्हा सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेने

जिल्हा बँकेत नोटबंदीने ग्रामीण भाग अडचणीत
५० टक्के शाखांत व्यवहार ठप्प : सहकारी बँकेत नोटा स्वीकारण्यास मनाईच्या निर्णयाचा फटका
गडचिरोली : चलनातून बाद झालेल्या १००० आणि ५०० च्या नोटा स्वीकारण्यास देशभरातील जिल्हा सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेने अचानक मनाई केली असून सोमवारी दुपारनंतर आलेल्या या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेची मोठी अडचण झाली आहे.
गडचिरोली हा राज्यातील दुर्गम जिल्हा आहे. या राज्यात अत्यंत दुर्गम गावापर्यंत गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्याच शाखा आहेत. राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांचे जाळे केवळ तालुका मुख्यालय व काही ठराविक मोठ्या गावातच आहे. जिल्ह्यात ११९ बँक शाखा असून त्यापैकी ५५ शाखा एकट्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आहेत. तसेच जिल्हा सहकारी बँकेचे एटीएम सुध्दा दुर्गम गावांमध्ये आहे. ८ नोव्हेंबरला नोटा बंदीचा निर्णय आल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अनेक शेतकरी, नागरिक व बँक ग्राहकांना त्यांच्या खात्यावर जुन्या नोटा जमा करून नव्या नोटा वितरणाचे काम सुरू केले होते. परंतु अचानक सोमवारी जुन्या नोटा न स्वीकारण्याचा निर्णय आल्याने जिल्ह्याच्या अर्थकारणावर याचा मोठा प्रभाव पडणार आहे. भामरागड तालुक्यात जवळजवळ ५० टक्के नागरिकांची खाती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आहे. तर कोरची तालुक्यातही ५०० रूपयांची नोट बदलविण्यासाठी नागरिकांना ५० किमीचे अंतर चालून येऊन यासाठी ३०० रूपये खर्च करावे लागत आहे. ही परिस्थिती गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, अहेरी, कोरची, कुरखेडा, धानोरा, मुलचेरा आदी दुर्गम तालुक्यातील सर्वच गावांची आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी अनेक नागरिक व ग्राहक जुळलेले आहेत. त्यामुळे या ग्राहकांना रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचा प्रचंड मोठा फटका बसला आहे. या निर्णयामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे मंगळवारी कोणतीही गर्दी दिसून आली नाही. ग्रामीण भागातील नागरिक तालुका मुख्यालयाच्या शाखांमध्ये गेले. मात्र तेथे त्यांच्या नोटा स्वीकारण्यात आल्या नाही. त्यामुळे त्यांची मोठी निराशा झाली. त्यामुळे शासनाने गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक स्थितीचा विचार करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला विशेष बाब म्हणून लोकांच्या सोयीसाठी जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या दृष्टीने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला माहिती द्यावी. (प्रतिनिधी)
रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या या निर्णयाची माहिती सोमवारी मिळाली. हा निर्णय देशव्यापी असून या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील बँक खातेदार, शेतकरी यांची मोठी अडचण होणार आहे. आमच्या सर्वच शाखा रिमोट एरियात आहेत. या संदर्भात राज्य सरकारच्या स्तरावरून काही हालचाली होऊ शकतात.
- सतीश आयलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
कोरची तालुक्यात जिल्हा को-आॅपरेटीव्ह बँकेच्या कोटगूल, बेतकाठी व कोरचीत तीन शाखा आहेत. तर राष्ट्रीयकृत बँकेची केवळ कोरचीतच एक शाखा सुरू आहे. सहकारी बँकेच्या कोरचीतील शाखेत ३४ हजार बँक खाते आहेत. बेतकाठी व कोटगूल शाखेत प्रत्येकी सात हजार बँक खाते आहेत. त्यामुळे सहकारी बँकेत पैसे बदलून द्यावे.
- नंदकिशोर वैरागडे, सामाजिक कार्यकर्ते, कोरची