कर्करोगाविषयी जिल्ह्यात जनजागृती
By Admin | Updated: February 5, 2017 01:35 IST2017-02-05T01:35:15+5:302017-02-05T01:35:15+5:30
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक कर्करोग दिन कार्यक्रम शनिवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी घेण्यात आला.

कर्करोगाविषयी जिल्ह्यात जनजागृती
ठिकठिकाणी रॅली : जिल्हा रूग्णालय व शाळांमध्ये मार्गदर्शन कार्यक्रम
गडचिरोली : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक कर्करोग दिन कार्यक्रम शनिवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी घेण्यात आला. या कार्यक्रमात कर्करोग आजाराविषयी जनजागृती करण्यात आली.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पथनाट्य व प्रभातफेरीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तसेच जागतिक कर्करोग दिन पंधरवडाचा शुभारंभ स्थानिक इंदिरा गांधी चौकात करण्यात आला. उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. सोनाली कुंभार, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. कैलास नगराळे, शिवाजी हायस्कूलचे मुकेश पदा, जि. प. हायस्कूलचे प्रमोद दशमुखे, राणी दुर्गावती कन्या विद्यालयाचे गेडाम उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. अनिल रूडे म्हणाले, उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय चांगला असून कोल्पोस्कोपी या आधुनिक तंत्रज्ञानानुसार गर्भाशय कर्करोग तपासणीचा अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा. सिगारेट, बिडी, तंबाखू, दारू अशा वाईट व्यसनांच्या आहारी जाऊ नये.
डॉ. कैलास नगराळे यांनी तंबाखूचे दुष्परिणाम, कोटप्पा कायदा याविषयी माहिती दिली. संचालन राहुल कंकनालवार तर आभार पवन दारोकर यांनी मानले. सूरज वनकर, डॉ. जयंत खिराळे, वैशाली बोबाटे, शिल्पा सरकार यांनी सहकार्य केले. तत्पूर्वी सकाळी तंबाखू सेवनामुळे मुख कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याचे पथनाट्याच्या सादरीकरणातून सांगण्यात आले व तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांची जनजागृती करण्यात आली. त्यानंतर शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली. या रॅलीत शिवाजी हायस्कूल, जि. प. हायस्कूल, राणी दुर्गावती कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी व शिक्षक सहभागी झाले.
गडचिरोली येथील स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांच्या वतीने कर्करोग जनजागृती रॅली काढण्यात आली. माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी प्राचार्य कविता पोरेड्डीवार, समशेर पठाण, प्राचार्य लीना हकीम, प्रा. अनिल धामोडे, प्राचार्य उषा रामलिंगम उपस्थित होत्या. शहरातील मुख्य मार्गाने सायकल रॅली काढून आयटीआय चौकापर्यंत नेण्यात आली. त्यानंतर इंदिरा गांधी चौकात व्यसनमुक्तीबाबत पथनाट्य सादर करण्यात आले. यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक निखील तुकदेव, गीता खोकले, शर्मिश वासनिक, गणेश पारधी, अभिलाषा चौधरी, महेंद्र बोकडे, राहुल आंबोरकर, मुमताज लाखानी, तपोती गयाली, भारती मस्के, जितेंद्र राक्षसभुवनकर, चिंतामण वाढणकर, अमोल चापले, अर्चना भर्रे, रजनी कोवे, मेघा नंदनपवार, जिल्हा गाईड संघटक नितेश झाडे, शिक्षकेत्तर कर्मचारी, पुरूषोत्तम निलेकार रवी चापले, माधव आलाम, भारती सातपैसे, वर्षा गोरडवार, वैशाली आलाम, विलास मेश्राम यांनी सहकार्य केले.
देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथे आरोग्य प्रबोधिनीच्या वतीने स्व. धनंजय नाकाडे आश्रमशाळेत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक देवेंद्र नाकाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सूर्यप्रकाश गभणे उपस्थित होते. गभणे यांनी कर्करोगाची कारणे, उपाय व प्रतिबंधक उपाय याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ४० टक्के कर्करोग तंबाखूशी संबंधित कारणामुळे होतो, असे गभणे यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली. संचालन व आभार हेमके यांनी मानले. यशस्वीतेसाठी बन्सोड, आरती पुराम यांनी सहकार्य केले. (लोकमत वृत्तसेवा)