बालकाच्या आधार नोंदणीत जिल्हा राज्यात दुसरा
By Admin | Updated: August 5, 2016 01:10 IST2016-08-05T01:10:03+5:302016-08-05T01:10:03+5:30
गडचिरोली जिल्हा आधार नोंदणीच्या बाबतीत राज्यात अकराव्या स्थानी आहे.

बालकाच्या आधार नोंदणीत जिल्हा राज्यात दुसरा
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : नागरिकांनी शिबिरात आधार कार्ड काढून घ्यावे!
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा आधार नोंदणीच्या बाबतीत राज्यात अकराव्या स्थानी आहे. सन २०१६ च्या अंदाजीत लोकसंख्येनुसार ११ लाख ३४ हजार ८८३ पैकी १० लाख ४३ हजार ९९२ लोकांचे आधार कार्ड तयार झाले असून आधार कार्ड नोंदणीची जिल्ह्याची टक्केवारी ९१.९९ एवढी आहे. अंगणवाडी बालक आधार नोंदणीत गडचिरोली जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असून जिल्ह्याची टक्केवारी ७३.८७ आहे. आधार कार्ड नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने शिबिर आयोजित करण्यात येणार असून नागरिकांनी आधार कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी केले.
आधार कार्ड नोंदणी कार्यक्रमाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते. बैठकीला सहायक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती, डी. जी. नान्हे, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे, शैलेंद्र मेश्राम, अतुल बनकर आदी उपस्थित होते.
उर्वरित बालकांचे, विद्यार्थ्यांचे व नागरिकांच्या आधार नोंदणीसाठी संबंधित विभागांनी आराखडा तयार करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. २ आॅगस्ट ते ३१ आॅगस्ट या कालावधीत आधार नोंदणीचे शिबिर आयोजित करून आधार नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी आव्हाड यांनी अधिकाऱ्यांना दिले.
आधार कार्ड आवश्यक करण्यात आले असल्याने आतापर्यंत ज्या नागरिकांनी, विद्यार्थी, तसेच अंगणवाडीतील बालकांनी आधार कार्डची नोंदणी केली नसेल, त्यांनी तत्काळ नोंदणी करून आधार कार्ड काढून घ्यावे, याकरिता प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आव्हाड यांनी केले आहे.यावेळी त्यांनी आधार कार्डच्या कामाचा आढावा घेतला. बैठकीला बाराही तालुक्याचे तहसीलदार, नायब तहसीलदार व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)
तालुकास्तरावर आधार कीट उपलब्ध
जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आधार नोंदणीसाठी तालुकास्तरावर आधार कीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यानुसार गडचिरोली तालुक्यासाठी सहा आधार संच, धानोरा तालुक्यासाठी तीन, चामोर्शी तालुक्यासाठी सात, देसाईगंज तालुक्यात तीन, आरमोरी तालुक्यासाठी तीन, कुरखेडा तालुक्यासाठी पाच, कोरची तीन, अहेरी पाच, सिरोंचा तीन, भामरागड तीन व एटापल्ली तालुक्यासाठी सहा आधार कार्ड कीट उपलब्ध आहेत, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.