जिल्ह्यातील उत्कृष्ट बचत गटांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST2020-03-02T06:00:00+5:302020-03-02T06:00:31+5:30
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि.प. गडचिरोलीच्या वतीने २८ फेब्रवारी ते १ मार्च दरम्यान स्थानिक चंद्रपूर मार्गावरील लॉनमध्ये गोंडवन महोत्सव २०२० तथा महिला बचत गटांच्या वस्तूंची जिल्हास्तरीय प्रदर्शनी आयोजित करण्यात आली. रविवारी उत्कृष्ट बचत गटांना सन्मानित करून या प्रदर्शनीचा समारोप करण्यात आला.

जिल्ह्यातील उत्कृष्ट बचत गटांचा गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हास्तरीय वस्तू प्रदर्शनीत उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील बचतगटांना सन्मानचिन्ह देऊन जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि.प. गडचिरोलीच्या वतीने २८ फेब्रवारी ते १ मार्च दरम्यान स्थानिक चंद्रपूर मार्गावरील लॉनमध्ये गोंडवन महोत्सव २०२० तथा महिला बचत गटांच्या वस्तूंची जिल्हास्तरीय प्रदर्शनी आयोजित करण्यात आली. रविवारी उत्कृष्ट बचत गटांना सन्मानित करून या प्रदर्शनीचा समारोप करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. एल. पुराम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, डीआरडीएचे प्रकल्प संचालक माणिक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक उमेदच्या जिल्हा व्यवस्थापिका चेतना लाटकर, संचालन कपील देवाळकर यांनी केले.
या बचत गटांचा सन्मान
उत्कृष्ट भोजन स्टॉल म्हणून प्रथम क्रमांक एटापल्ली तालुक्याच्या जीवनगट्टा येथील रमाबाई स्टॉल, द्वितीय क्रमांक मुलचेराचा राधेशाम स्टॉल व तृतीय क्रमांक धानोराच्या सरस्वती स्टॉलने पटकाविला. मिना दखणे, योगीता भांडेकर, शेवंता पवार यांना विशेष प्रोत्साहनपर पारितोषीक देण्यात आले. लाकडी वस्तूंमध्ये आरमोरी तालुक्याच्या वासाळा, जीवनगट्टा व कोरेगावच्या गटाला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.