बाधित शेतकऱ्यांना २ कोटी १९ लाखांचे वाटप
By Admin | Updated: April 19, 2015 01:30 IST2015-04-19T01:30:38+5:302015-04-19T01:30:38+5:30
२०१४ मध्ये अतिवृष्टीने बाधित झालेल्या ४ हजार ६३४ शेतकऱ्यांना २ कोटी १९ लाख रूपयांचे वाटप करण्यात आले, ...

बाधित शेतकऱ्यांना २ कोटी १९ लाखांचे वाटप
गडचिरोली : २०१४ मध्ये अतिवृष्टीने बाधित झालेल्या ४ हजार ६३४ शेतकऱ्यांना २ कोटी १९ लाख रूपयांचे वाटप करण्यात आले, अशी माहिती पालक सचिव विकास खारगे यांनी शनिवारी घेतलेल्या आढावा बैठकीत गडचिरोली जिल्हा प्रशासनाने दिली.
राज्यातील सत्तांतरणानंतर शनिवारी जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे पहिल्यांदाच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेत. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी रणजितकुमार, मुख्य वन संरक्षक टी. एस. के. रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी खारगे यांनी जिल्ह्यातील २०१४-१५ या आर्थिक वर्षातील भौतिक व आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. तसेच गारपीट नुकसानीबाबत शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या मदत वाटपाचाही माहिती घेतली. याशिवाय जिल्हा नियोजन निधीतील तरतूद, शासनस्तरावर जिल्ह्यातील प्रलंबित असलेले प्रश्न व जलयुक्त शिवार अभियान या बाबींचा प्रकर्षाने आढावा घेतला. २०१४ मध्ये ४ हजार ६३४ शेतकऱ्यांना २ कोटी १९ लाखांचा वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यात १० लाख ७१ हजार ७९५ लोकसंख्या आहे. त्यापैकी ८ लाख ९८ हजार १५८ नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आले आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियान १५२ गावांमध्ये राबविण्यात येत असून ४ हजार ११८ कामे नियोजित करण्यात आली आहे. सध्या १ हजार १४७ कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.
तसेच २०१४-१५ मध्ये सर्वसाधारण, आदिवासी उपयोजन, ओटीएसपी व अनुसूचित जाती उपयोजनाचा १०० टक्के निधी खर्च करण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी पालक सचिवांना सांगितले. चालू आर्थिक वर्षात जिल्हा विकास निधी खर्च करीत असताना परिणामकारक व नियोजित वेळेत तो खर्च करावा, असे निर्देश प्रशासनाला खारगे यांनी दिले. त्यानंतर पालक सचिव खारगे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नही जाणून घेतले.