सायकल वाटप योजनेत दिरंगाई

By Admin | Updated: August 27, 2016 01:16 IST2016-08-27T01:16:29+5:302016-08-27T01:16:29+5:30

मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून

Dissolute under the cycle distribution scheme | सायकल वाटप योजनेत दिरंगाई

सायकल वाटप योजनेत दिरंगाई

शाळाही उदासीन : निम्म्या तालुक्यातील प्रस्ताव अप्राप्त; गरजु मुलींची शाळेला पायदळ वारी
गडचिरोली : मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून ५ किमी अंतरावर राहणाऱ्या गरजू मुलींना सायकल वाटप करण्याची योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत राबविली जाते. मात्र यंदा सन २०१६-१७ सत्रात मुलींना मोफत सायकल वाटपाबाबतचे केवळ सहा तालुक्यातील प्रस्ताव शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. उर्वरित सहा तालुक्यातील शाळांचे प्रस्ताव गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत जि. प. शिक्षण विभागाला अद्यापही प्राप्त झाले नाही. यंदाचे शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र या योजनेच्या कालावधीत शिक्षण विभागाकडून प्रचंड दिरंगाई होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

मुलींचे शिक्षणात प्रमाण वाढावे, स्वगावावरून बाहेर गावच्या शाळांमध्ये ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींच्या अध्ययन प्रक्रियेत खंड पडू नये, यासाठी शासनाच्या वतीने मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत गरजू मुलींना मोफत सायकल वाटप करण्याची योजना गेल्या अनेक वर्षांपासून राबविली जात आहे. या योजनेंतर्गत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या गरजू मुलींना सायकल वाटप करण्यासाठी अनुदानित, विनाअनुदानित माध्यमिक शाळांकडून गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव मागविले जातात. सदर प्रस्ताव प्राप्त झाल्यावर योग्य नियोजन करून सदर प्रस्ताव जिल्हा मानव विकास समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे जि. प. माध्यमिक शिक्षण विभागामार्फत सादर केले जातात. जिल्हाधिकारी या प्रस्तावाला मंजुरी देऊन मानव विकास मिशनमधून निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करतात. सदर निधी प्राप्त झाल्यानंतर हा निधी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या संयुक्त खात्यात जि. प. शिक्षण विभागामार्फत वर्ग केला जातो, यात संबंधित विद्यार्थिनीच्या बँक खात्यात सुरुवातीला दोन हजार व त्यानंतर एक हजार असे एकूण तीन हजार रूपयांचे अनुदान दिले. या अनुदानातून संबंधित गरजू विद्यार्थिनीला मोफत सायकल उपलब्ध करून दिली जाते, अशी या योजनेच्या अंमलबजावणीची पद्धत आहे.
जि. प. चे (माध्यमिक) शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम यांनी सर्वप्रथम १२ जुलै २०१६ रोजी सर्व पंचायत समिती स्तरावरील गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून मोफत सायकल वाटपाबाबतचे प्रस्ताव शाळांकडून प्राप्त करून ते जि. प. च्या माध्यमिक शिक्षण विभागाला सादर करावेत, असे निर्देश दिले होते. मात्र यंदाचे शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अर्ध्या तालुक्यातून याबाबतचे शाळांचे प्रस्ताव प्राप्त झाले नाहीत. सद्य:स्थितीत विद्यार्थिनींना शाळा वाटपाबाबतचे प्रस्ताव गडचिरोली, कुरखेडा, एटापल्ली, चामोेर्शी, धानोरा व सिरोंचा या सहा तालुक्यातील प्राप्त झाले आहे. उर्वरित भामरागड, अहेरी, आरमोरी, मुलचेरा, देसाईगंज, कोरची या सहा तालुक्यातील शाळांचे प्रस्ताव प्राप्त झाले नाही. त्यामुळे सायकल वाटप योजनेच्या अंमलबजावणीत प्रचंड दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे.

सन २०१५-१६ सत्रात सायकलचे वाटप नाही
मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या बाहेर गावावरून शाळेत येणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्याची योजना दरवर्षी राबवायची आहे. सदर योजना राबविणारी यंत्रणा माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली ही आहे. सन २०१४-१५ या सत्रात या योजनेंतर्गत गरजू मुलींना सायकलचे मोफत वाटप करण्यात आले होते, मात्र गतवर्षी या योजनेची अंमलबजावणी करण्यात प्रचंड दिरंगाई झाली. त्यामुळे सन २०१५-१६ या सत्रात मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले नाही. विशेष म्हणजे याबाबत मानव विकास मिशनच्या नियोजन कार्यालयात चौकशी केली असता, मोफत सायकल वाटप बाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला जि. प. शिक्षण विभागाकडून प्राप्त झाले नाही, अशी माहिती मिळाली.

Web Title: Dissolute under the cycle distribution scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.