सातबारावरील भूसंपादनाखाली शब्द खारीज करा
By Admin | Updated: April 24, 2017 01:10 IST2017-04-24T01:10:22+5:302017-04-24T01:10:22+5:30
आष्टी येथे एमआयडीसी स्थापन करण्यासाठी येथील शेतकऱ्यांची जमीन हस्तांतरीत करण्यात आली. शेतकऱ्यांच्या सातबारावर भूसंपादनाखाली असे नमदू करण्यात आले.

सातबारावरील भूसंपादनाखाली शब्द खारीज करा
प्रकल्पग्रस्तांची मागणी : आष्टी एमआयडीसीचा प्रश्न प्रलंबित
आष्टी : आष्टी येथे एमआयडीसी स्थापन करण्यासाठी येथील शेतकऱ्यांची जमीन हस्तांतरीत करण्यात आली. शेतकऱ्यांच्या सातबारावर भूसंपादनाखाली असे नमदू करण्यात आले. परंतु पाच वर्षांपासून येथील एमआयडीसीचा प्रश्न सुटल्याने शेतकऱ्यांच्या सातबारावरील भूसंपादनाखाली हा शब्द खारीज करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्याकरिता एमआयडीसी स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्या दृष्टीने भूसंपादन अधिनियम कायद्यानुसार आष्टी येथील १०५ शेतकऱ्यांचे सातबारा व जवळपास १९७ हेक्टर जमीन हस्तांतरण करण्यात आली. मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. शेतकऱ्यांच्या सातबारावर ‘भूसंपादनाखाली’ असे स्पष्ट नमूद असल्याने शेतामध्ये कुठलेही काम शेतकऱ्यांना करता येत नाही. जवळपास पाच वर्षापासून येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना शेतात काम करणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे शेतामध्ये उत्पन्नवाढीसाठी सोयीसुविधा करणे स्वप्नच ठरत आहे. यामुळे प्रकल्पग्रस्त अडचणीत सापडले असून शासनाने शेतकऱ्यांच्या अटी मान्य करून एक तर शेतीचा योग्य मोबदला द्यावा, अन्यथा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सातबारावरील भूसंपादनाखाली हा शब्द खारीज करण्यात यावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्त १०५ शेतकऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)