अहेरीसाठी व्हीप जारी करण्याची भाजपवर नामुष्की
By Admin | Updated: November 26, 2015 01:09 IST2015-11-26T01:09:41+5:302015-11-26T01:09:41+5:30
भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेल्या अहेरी नगर पंचायतीत नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारांनी भाजपकडून नामांकनपत्र

अहेरीसाठी व्हीप जारी करण्याची भाजपवर नामुष्की
पालकमंत्र्याच्या नेतृत्वावर टीका : दोन उमेदवार रिंगणात राहिल्याने पेच
अहेरी : भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेल्या अहेरी नगर पंचायतीत नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारांनी भाजपकडून नामांकनपत्र दाखल करून ते कायम ठेवल्याने भारतीय जनता पक्षावर मतदानाच्या तोंडावर व्हीप जारी करण्याची पाळी आली आहे.
अहेरी नगर पंचायतीत भारतीय जनता पक्षाला १७ पैकी ९ जागा मिळाल्या. भाजपच्या वतीने हर्षा रवींद्र ठाकरे व प्राजक्ता सचिन पेदापल्लीवार यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मंगळवारी नामांकनपत्र पेदापल्लीवार यांनी मागे घेतले नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या नेतृत्व क्षमतेवर भाजपमधील जुन्या नेत्यांनी बुधवारी प्रचंड टीकेचा भडीमार केला. नामांकनपत्र मागे घेतले नसल्याची बाब लक्षात घेऊन भाजपने लगेच बॅक डेटमध्ये पक्षाचा व्हीप जारी करून हर्षा ठाकरे यांना नगराध्यक्षपदी तर अन्नपूर्णा दामोधर सिडाम यांना उपाध्यक्षपदासाठी मतदान करण्याबाबत सदस्यांना मतदान करण्याबाबत सूचविले आहे.
या घटनेमुळे भाजपमधील गटबाजी जाहीररीत्या समोर आली. पक्षाला बहुमत असताना दोघांचे अर्ज नगराध्यक्ष पदासाठी का भरण्यात आले, यावरही भाजपच्या जिल्हास्तरावरील नेत्यांमध्ये जोरदार चर्चेचा खल झाला. अर्ज कायम ठेवणाऱ्या प्राजक्ता पेदापल्लीवार यांचे यजमान यापूर्वी अहेरी ग्राम पंचायतीचे उपसरपंच होते व ते नाविसंचे जुने कार्यकर्ते असल्याने भाजपच्या जुन्या निष्ठावानांनी त्यांना डावलल्याची भावना अहेरीत आहे.