सात वर्षांपासून दवाखान्याचे वाहन आजारी
By Admin | Updated: February 26, 2015 01:45 IST2015-02-26T01:45:06+5:302015-02-26T01:45:06+5:30
चामोर्शी पं. स. अंतर्गत आष्टी येथे पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी १ व फिरते पशुवैद्यकीय चिकित्सालय आहे. मात्र या फिरत्या पशु वैद्यकीय दवाखान्याचे वाहन मागील ...

सात वर्षांपासून दवाखान्याचे वाहन आजारी
आष्टी : चामोर्शी पं. स. अंतर्गत आष्टी येथे पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी १ व फिरते पशुवैद्यकीय चिकित्सालय आहे. मात्र या फिरत्या पशु वैद्यकीय दवाखान्याचे वाहन मागील सात वर्षांपासून नादुरूस्त आहे. सदर वाहनाची दुरूस्ती करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील पशु पालकांनी केला आहे.
येथील पशु वैद्यकीय चिकित्सालयाचे वाहन २००७ पर्यंत सुस्थितीत होते. मात्र त्यानंतर या वाहनात बिघाड झाला. तेव्हापासून वाहन नादुरूस्त अवस्थेत आहे. या वाहनाच्या दुरूस्तीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केल्याने सद्यस्थितीत वाहने भंगार झाले आहे. त्यामुळे वाहनाचा लाभ परिसरातील पशुपालकांना मिळणे कठिण झाले आहे. वाहनाअभावी परिसरातील गावांमध्ये पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना फिरून येथील समस्या जाणून घेताना अडचण येत आहे. आष्टी परिसरातील गावांमध्ये गायी, म्हशी, शेळ्या आदी जनावरांची संख्या लक्षणीय आहे. पावसाळ्यात जनावरांना विविध रोगांची लागण होते. मागील खरीप हंगामात अनेक जनावरे उपचाराअभावी दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे शासकीय वाहन नसल्याने ते गावांमध्ये दौरे करून तेथील पशुवंर औषधोपचार करू शकत नाही. परिणामी अनेक जनावरे दगावतात. त्यामुळे परिसरातील पशुपालकांमध्ये तीव्र अंसतोष व्यक्त होत आहे. तज्ज्ञ डॉक्टरांअभावी येथील कर्मचारीच जनावरांवर उपचार करीत असल्याने अनेकदा योग्य उपचार होऊ शकत नाही. याचा फटका पशुपालकांना पावसाळा व उन्हाळ्यात सर्वाधिक सहन करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन आष्टी येथील पशु वैद्यकीय दवाखाना व फिरते पशुचिकित्सालयात स्थायी डॉक्टरांची त्वरित नियुक्ती करावी, अशी मागणी परिसरातील पशु पालकांनी केली आहे. आष्टी परिसरातील अनेक गावांमध्ये विविध आजारांनी जनावरे दगावल्याच्या घटनाही अनेकदा घडल्याच्या उघडकीस आल्या आहेत. (प्रतिनिधी)