भाजप व नगर पालिका पदाधिकाऱ्यांमध्ये ‘तह’ची चर्चा
By Admin | Updated: December 1, 2014 22:53 IST2014-12-01T22:53:48+5:302014-12-01T22:53:48+5:30
गडचिरोली नगर पालिकेवर युवाशक्ती आघाडीचे वर्चस्व आहे. युवाशक्ती आघाडीतून आता सत्ताधारी शिवसेनेकडे वाटचाल करू लागले आहे. शहर विकासासाठी खासदार व आमदारांच्या फंडातून निधी मिळावा,

भाजप व नगर पालिका पदाधिकाऱ्यांमध्ये ‘तह’ची चर्चा
गडचिरोली : गडचिरोली नगर पालिकेवर युवाशक्ती आघाडीचे वर्चस्व आहे. युवाशक्ती आघाडीतून आता सत्ताधारी शिवसेनेकडे वाटचाल करू लागले आहे. शहर विकासासाठी खासदार व आमदारांच्या फंडातून निधी मिळावा, अशी पालिका पदाधिकाऱ्यांची मागणी रास्त आहे. मात्र खासदार व आमदार हे भाजपचे असल्याने त्यांचा निधी पालिकेकडे विकास कामासाठी जात असेल तर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही सोय लागली पाहिजे, असा एक मतप्रवाह भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे पालिकेला निधी देताना खासदार व आमदारांनी नगर परिषदेचा कारभार पाहणाऱ्या धुरीनींशी चर्चा करून काही काम तुम्ही तर काही काम आम्ही या तत्वावर निधीचे वाटप झाले पाहिजे, अशी अट घालण्यात आली असल्याची चर्चा आहे. नगर परिषदेच्या धुरीनींनी लोकसभा निवडणुकीत खासदारांसाठी प्रचंड काम करून त्यांना यश मिळवून दिले. तर विधानसभा निवडणुकीत आपल्या मतानुसार उमेदवार न दिल्या गेल्यामुळे नगरपालिकेचे बहुतांशी पदाधिकारी सेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेऊन होते. त्यामुळे भाजपशी त्यांचे वितुष्ट आले. आता खासदार, आमदारांकडे निधी मागावा कसा हा प्रश्न निर्माण झाला होता. अलिकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही स्वतंत्र भेट न.प.च्या पदाधिकाऱ्यांनी घेऊन शहर विकासासाठी निधीची मागणीही केली होती. आता भाजप, न.प. पदाधिकारी यांच्यामध्ये विकास कामांना मिळणाऱ्या निधीबाबत तह झाल्याची चर्चा शहरभर पसरली आहे. या तहनंतर आता खासदार, आमदारांचा निधी शहराला मिळेल. पालिका पदाधिकारी आपल्या ठेकेदारांना काही कामे देतील. तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही शहराच्या कामात काही वाटा मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली. अशी सूत्रांची माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)