दुर्गम भागातील टीएचओ कार्यालयातून गायब
By Admin | Updated: March 3, 2016 01:23 IST2016-03-03T01:23:59+5:302016-03-03T01:23:59+5:30
ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेची अंमलबजावणी करण्याचे काम ज्या मुख्य अधिकाऱ्यावर आहे. तो अधिकारी म्हणजे तालुका आरोग्य अधिकारी.

दुर्गम भागातील टीएचओ कार्यालयातून गायब
अनेकांनी सांगितले खोटे कारण : केवळ चार तालुका आरोग्य अधिकारीच कार्यालयात होते हजर
गडचिरोली : ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेची अंमलबजावणी करण्याचे काम ज्या मुख्य अधिकाऱ्यावर आहे. तो अधिकारी म्हणजे तालुका आरोग्य अधिकारी. मात्र हा अधिकारीच आपल्या कार्यालयात शासकीय कामकाजाच्या दिवशी हजर न राहता विनाकारण गैरहजर राहत असल्याची बाब लोकमत चमूने मंगळवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उजेडात आली आहे. गैरहजेरीमागे अतिशय खोटी कारणे या जबाबदार अधिकाऱ्यांनी दिलेली आहेत, असे दिसून आले आहेत.
जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, आरोग्य पथक यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या दुर्गम, अतिदुर्गम गावांमध्ये आरोग्यसेवा पोहोचविली जाते. जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेचे काम प्रत्येक तालुक्यात तालुका आरोग्य अधिकाऱ्याच्या अधिनस्त काम चालविले जाते. गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुक्यांमध्ये तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना स्वतंत्र कार्यालय व त्यांच्या दिमतीस मोठी यंत्रणा देण्यात आली आहे. मात्र या यंत्रणेचा कर्णधार असलेला तालुका आरोग्य अधिकारीच बेजबाबदारपणे काम करीत शासकीय कार्यालयीन कामकाजाच्या दिवशीही आपल्या कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचे ‘लोकमत’ने मंगळवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उजेडात आले.
‘लोकमत’ने ११ तालुक्यांमध्ये मंगळवारी तर कुरखेडा येथे नमूना म्हणून बुधवारी स्टिंग आॅपरेशन करविले. लोकमतची चमू तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० या वेळात पोहोचली. यावेळी फक्त चामोर्शी, आरमोरी, भामरागड व धानोरा या चार ठिकाणीच तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित असल्याचे दिसून आले. लोकमतचा प्रतिनिधी धानोरा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचला. त्यावेळी ते खुर्चीवर टीएचओ नव्हते. ते का आले नाही, हे विचारणा करण्यासाठी मोबाईलवर संपर्क केला असता, ते चहा पिण्यासाठी समोरच्या टपरीवर गेले होते. लोकमतचा कॅमेरा फिरताच ते आपल्या आसनावर स्थानापन्न झाले. मात्र इतर ठिकाणी एकही तालुका आरोग्य अधिकारी लोकमत चमूला दिसला नाही. यातील काही जणांशी प्रत्यक्ष तर काही ठिकाणी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना साहेबांच्या गैरहजेरीबाबत विचारणा केली असता, सबसेल खोटे कारण या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिले. यावरून दुर्गम भागात अनेक ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी व डॉक्टर जातच नाही, ही बाब पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.