वन कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे सक्त निर्देश
By Admin | Updated: December 16, 2015 01:49 IST2015-12-16T01:49:49+5:302015-12-16T01:49:49+5:30
तालुक्यातील बहुतांश वन कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने जंगलाची तोड वाढली आहे. त्याचबरोबर तस्करांची हिम्मतही वाढत चालली आहे.

वन कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे सक्त निर्देश
धानोरा : तालुक्यातील बहुतांश वन कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने जंगलाची तोड वाढली आहे. त्याचबरोबर तस्करांची हिम्मतही वाढत चालली आहे. या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी प्रत्येक वन कर्मचाऱ्याने मुख्यालयी राहावे, असे सक्त निर्देश वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
धानोरा तालुक्यात चातगाव, पेंढरी, उत्तर धानोरा, दक्षिण धानोरा, मुरूमगाव या वन परिक्षेत्र कार्यालयात शेकडो कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. जंगलाची तोड विशेष करून रात्री व पहाटेच्या सुमारास होत असल्याने मुख्यालयी राहून परिस्थितीवर जंगल तोडीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मात्र धानोरा तालुक्यातील बहुतांश वन कर्मचारी मुख्यालयी न राहता, चंद्रपूर, गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा येथून ये- जा करतात. सायंकाळी घराकडे निघून दुपारी उशिरापर्यंत कर्तव्यावर पोहोचतात. परिणामी वन तस्करांसाठी रान मोकळे झाले आहे. धानोरा तालुक्याच्या सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहेत. या भागातून मोठ्या प्रमाणात लाकडाची तस्करी होत असल्याचे दिसून आले आहे. जानेवारीपासून लग्न सराईला सुरूवात होणार आहे. या कालावधीत वर-वधूला भेट देण्यासाठी पलंग, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, कपाट, सोपा, देवघर आदी वस्तुंची मोठ्या प्रमाणात मागणी वाढते. यासाठी झाडांची तोड केल्या जाते. त्यामुळे वन कर्मचारी मुख्यालयी राहून जंगलात गस्त घालणे आवश्यक झाले आहे.
एमआरईजीएसचे काम वन विभागाच्या मार्फतीने केले जाते. या कामाचे मापन, मजुरांवर नियंत्रण, मजुरीचे वितरण, मजुरांच्या समस्या आदी जाणून घेणे आवश्यक आहे. अवैध लाकुड तस्करीवर आळा घालण्याच्या दृष्टीनेही प्रत्येक कर्मचाऱ्याने मुख्यालयी राहावे, असे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. (तालुका प्रतिनिधी)