खोदकामाची माती तलाव पात्रात

By Admin | Updated: June 30, 2017 01:09 IST2017-06-30T01:09:58+5:302017-06-30T01:09:58+5:30

तालुक्यातील खैरी येथील मामा तलावाच्या खोलीकरण व बळकटीकरणाच्या कामातील खोदकामाची माती संबंधित

Digging soil pond in the bowl | खोदकामाची माती तलाव पात्रात

खोदकामाची माती तलाव पात्रात

अहेरी येथील प्रकार : ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांनी केला पंचनामा
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : तालुक्यातील खैरी येथील मामा तलावाच्या खोलीकरण व बळकटीकरणाच्या कामातील खोदकामाची माती संबंधित कंत्राटदाराने तलावाच्या पात्रात टाकली. तसेच तलावात पाणी येण्याच्या प्रवाहाच्या मार्गावरच माती टाकल्याने सदर तलावाची सिंचन क्षमता वाढण्यापेक्षा घटण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे. या कामाचा पंचनामा थेट तलाव कामाच्या ठिकाणी जाऊन ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी केला.
सदर तलावाचे खोदकाम चुकीच्या पद्धतीने झाल्याने यासंदर्भातील तक्रार गावकऱ्यांनी संबंधित विभागाचे अधिकारी व कंत्राटदाराकडे केली. मात्र या तक्रारीकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. परिणामी सिंचन विभागाच्या नियोजन शून्य कारभाराविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
बेलगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खैरी येथील सर्वे क्र. १४०/४१ मधील मोठ्या तलावाची सिंचन क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण व जलसंपदा विभाग चंद्रपूर अंतर्गत मे महिन्यात तलावाच्या पात्रात १०० बाय ५५ मीटर लांबी, रूंदी व सात फूट खोलीचे फिश टँकचे खोदकाम करण्यात आले. तसेच जेसीबी यंत्राच्या सहाय्याने तलावाच्या पात्रात खोदकाम करण्यात आले. मात्र खोदकामानंतर निघालेली माती (गाळ) तलावाच्या पाळीवर अथवा तलाव पात्राच्या बाहेर टाकणे आवश्यक होते. मात्र संबंधित कंत्राटदाराने तसे काहीही न करता खोदकामानंतरची माती तलावाच्या पात्रातच फेकून दिली. याशिवाय जंगलाच्या दिशेने तलावाच्या पात्रात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावरच संबंधित कंत्राटदाराने खोदकामानंतरची माती टाकून पाणी येण्याचा मार्ग बंद केला. त्यामुळे तलावाच्या सिंचन क्षमतेवर परिणाम होणार आहे. ग्रामस्थांनी या बाबीची तक्रार ग्रा. पं. कडे केल्यानंतर सरपंच, ग्रामसेवक व तलाठ्यांनी या तलावाच्या कामाचा पंचनामा केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून सदर कामाची चौकशी करण्याची मागणी पं. स. सदस्य संध्या नैताम, गुरूदेव कोल्हे, प्रभाकर करमकर, अशोक गायकवाड, दिलीप गायकवाड, हरीदास कोल्हे, निखील मोहणे, योगेश गावडे, अरूण कुंभरे यांनी केली आहे.

Web Title: Digging soil pond in the bowl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.