गडचिरोली जिल्ह्यातल्या बाजागड डोंगरावरील दगड वाजतो टिंग.. टिंग..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 13:07 IST2018-03-28T12:57:55+5:302018-03-28T13:07:56+5:30
धानोरा तालुक्यातील कुलभट्टी गावाजळ असलेल्या बाजागड या डोंगरावरील एका मोठ्या दगडातून अनेक प्रकारचे आवाज निघत असल्याचे वास्तव येथे पहावयास मिळते.

गडचिरोली जिल्ह्यातल्या बाजागड डोंगरावरील दगड वाजतो टिंग.. टिंग..

गडचिरोली: धानोरा तालुक्यातील कुलभट्टी गावाजळ असलेल्या बाजागड या डोंगरावरील एका मोठ्या दगडातून अनेक प्रकारचे आवाज निघत असल्याचे वास्तव येथे पहावयास मिळते. या दगडाशी संबंधित परिसरातील गोंड आदिवासींच्या धार्मिक भावना जुळलेल्या आहेत. चैत्र पोर्णिमेला गोंडी धर्मगुरू मुठवापोय पहांदि पारी कुपार लिंगो यांच्या नावाने एक दिवसाची भव्य यात्रा येथे प्राचीन काळापासून भरवली जाते. यंदा ही यात्रा ३१ मार्च रोजी भरणार आहे.
मुरुमगावाच्या पूर्वेला कुलभट्टी गाव सहा कि.मी. अंतराव र आहे. याच गावाच्या उत्तर-पूर्वेला दीड कि.मी. अंतरावर बाजागड हा १५०० ते २००० फूट उंचीचा डोंगर आहे.
त्याच्या टोकावर सुमारे वीस फूट लांबीचा एक मोठा दगड आहे. या दगडावर दुसऱ्या एका लहान दगडाने मारल्यास त्याच्या विविध भागातून विभिन्न स्वर निघतात. गोंडांचे गुरू याच डोंगरावर अठरा वाद्ये एकाच वेळी वाजवीत असत अशी आख्यायिका आहे. यानिमित्ताने येथे दरवर्षी यात्रा भरते. यात्रेत छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगण व महाराष्ट्रातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.