आगाराच्या पंपवरूनच बसमध्ये भरणार डिझेल
By Admin | Updated: September 6, 2014 23:49 IST2014-09-06T23:49:36+5:302014-09-06T23:49:36+5:30
आगाराच्या पंपात मिळणारे अनुदानीत इंधन बंद केल्यानंतर खासगी पंपावर डिझेल भरतांना प्रवाशांना अनेकदा त्रास सहन करावा लागत होता. यातून अनेकदा वादही उद्भवत होते.

आगाराच्या पंपवरूनच बसमध्ये भरणार डिझेल
गडचिरोली : आगाराच्या पंपात मिळणारे अनुदानीत इंधन बंद केल्यानंतर खासगी पंपावर डिझेल भरतांना प्रवाशांना अनेकदा त्रास सहन करावा लागत होता. यातून अनेकदा वादही उद्भवत होते. त्यामुळे वर्षभरानंतर शासन व परिवहन महामंडळाने आगाराच्या पंपातूनच बसमध्ये डिझेल भरण्याचा निर्णय घेतला आहे.
वर्षभरापूर्वी शासनाने सर्वच शासकीय वाहनांना अनुदानीत इंधनाचा पुरवठा कमी केला होता. त्यानंतर वर्षभरात खासगी इंधनाच्या दरात झालेली वाढ ही शासनाकडून पुरविण्यात येणारे इंधन व बाजारातील इंधनाचे दर यात कुठलीही तफावत नव्हती. परिणामी डिझेल भरण्यासाठी पेट्रोलपंपावर बसेसला रांगा लावाव्या लागत होत्या. त्यामुळे इंधन भरतांना प्रवाशांचा वेळ वाया जात होता. परिणामी अनेक प्रवाशी त्रस्त झाले होते. याबाबत राज्य परिवहन महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली होती. मिश्रीत इंधनामुळे महामंडळालाही फटका सहन करावा लागत होता. खासगी पेट्रोलपंपचालक कधीही संप करण्याची शक्यता गृहित धरून प्रवाशांचे हाल होऊ नये, म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या आगारातच इंधन देणे अत्यावश्यक झाले होते. गडचिरोली येथील पेट्रोलपंपाची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला इंधन पुरवितांना पेट्रोलपंप चालकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते.
अनेकदा पेट्रोलपंपवर बसेस उभ्या राहत होत्या. त्यामुळे प्रवाशांकडून वारंवार तक्रारी होत होत्या. याची दखल घेत शासनाने आगारातून इंधन भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शासनाच्या या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. (शहर प्रतिनिधी)