धर्मा रॉयचे अतिक्रमण पाडले
By Admin | Updated: February 18, 2017 01:57 IST2017-02-18T01:57:06+5:302017-02-18T01:57:06+5:30
आष्टी रोडजवळील मोठ्या नहराला लागून असलेल्या भूमापन क्रमांक १४४१/१ आराजीमधील ८.२८ हेक्टरपैकी

धर्मा रॉयचे अतिक्रमण पाडले
महसूल प्रशासनाची कारवाई : घरातील साहित्य जप्त
गडचिरोली : आष्टी रोडजवळील मोठ्या नहराला लागून असलेल्या भूमापन क्रमांक १४४१/१ आराजीमधील ८.२८ हेक्टरपैकी १.६० हेक्टर आर या शासकीय जागेवर धर्मा निमाई रॉय यांनी अनधिकृत अतिक्रमण केले होते. परंतु महसूल प्रशासनाने अतिक्रमण केलेल्या जागेवर शुक्रवारी पक्के अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने पाडले आहे. या अतिक्रमणामध्ये सभामंडप, मंदिर यांचाही समावेश आहे.
याच परिसरात अनधिकृत अतिक्रमण केलेल्या इतर अतिक्रमणधारकांना नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील इतर अनधिकृत अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे. ही अतिक्रमण काढण्याची कारवाई उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपादे, तहसीलदार अरूण येरचे, मुख्याधिकारी अर्शीया जुही, पोलीस निरिक्षक किरण अवचार, नायब तहसीलदार देवेंद्र दहिकर, एन. पी. मंथनवार, एस. के. बावणे, मंडळ अधिकारी पी. एम. बोदलकर, तलाठी शेडमाके, तहसील व नगर पंचायतीचे कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थित करण्यात आली.
तसेच अतिक्रमणधारक सेपाली बलराम मंडल हिने केलेले ०.२० हेक्टर आर वरील यांचे शेती, मंदिराचे अतिक्रमण काढण्यात आले. तर अतिक्रमण हटविण्यासाठी तहसीलदार यांनी १४ आॅक्टोबर २०१६ व १५ डिसेंबर २०१६ रोजी नोटीस बजाविले होते. मात्र सदर अतिक्रमण राजकीय दबावापोटी न काढता वारंवार पळवाटा शोधण्यात येत होत्या.
धर्मा रॉय याच्या अतिक्रमणासंदर्भात अनेक तक्रारी शहरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते माणिकराव तुरे यांनीही अधिकाऱ्यांकडे केल्या होत्या. धर्मा रॉय याच्या घरातील साहित्य काढून त्याचा पंचनामा करून ते साहित्य जप्त करण्यात आले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)