The Dhanora-queue route got knocked out | धानोरा-रांगी मार्ग खरडला
धानोरा-रांगी मार्ग खरडला

ठळक मुद्देचिखलाचे साम्राज्य : मोठी वाहने नेताना अडचण; अपघाताची शक्यता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : १३ व १४ आॅगस्ट रोजी धानोरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धानोरा-रांगी मार्गावरील पुसावंडी गावाजवळचा अर्धा रस्ता खरडून गेला आहे. एक ते दीड फूट खोल खड्डा पडला आहे. वाहनधारकांना जीव धोक्यात घालून या मार्गाने प्रवास करावा लागत आहे.
धानोरा ते ठाणेगावपर्यंत ४३ किमी रस्त्याच्या बांधकामाला मंजुरी प्रदान करण्यात आली. उन्हाळ्यात रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथील बॉम्ब स्फोटाच्या घटनेनंतर ठेकेदाराने काम अर्धवट सोडून दिले आहे. या मार्गावर सोडेपासून मोहलीपर्यंतचा रस्ता खोदून मुरूम पसरविण्यात आला होता. पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत गेल्याने मार्गाचा बराचसा भाग खरडून गेला आहे. या ठिकाणावरून वाहन नेणे जोखमीचे झाले आहे. तरीही एसटी महामंडळाची बस या मार्गाने चालविली जाते.
१३ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कुसावंडी गावाजवळ मोठा खड्डा पडला आहे. या मार्गावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. आधीच चिखलमय रस्ता झाला आहे. त्यातच खड्ड्यांमध्ये पाणी जमा झाले आहे. चारचाकी वाहने समोरासमोर आल्यास फार मोठी अडचण निर्माण होते. रस्त्याचा काही भाग जवळपास एक फूट खरडून गेला आहे. बाजूची जागा दलदलीची आहे. त्यामुळे वाहन फसण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्य:स्थितीत या मार्गावरून बस चालविली जात आहे. मात्र पुन्हा अतिवृष्टी झाल्यास बस नेणे अशक्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस झाल्यानंतर या मार्गावर चिखल निर्माण होते. त्यामुळे बस कधीकधी नेण्यास अडचण निर्माण होते. १५ आॅगस्ट रोजी रस्ता खराब असल्याने या मार्गाने बस गेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी बसने मॉडेल स्कूल मोहली येथे जावे लागले.
मार्गाची दुरूस्ती करा
मार्ग खरडून गेल्याने वाहन चालविणे कठीण झाले आहे. समोरासमोर दोन वाहने आल्यास मार्ग देताना फार मोठी अडचण निर्माण होते. पुन्हा पाऊस झाल्यास मार्ग खरडून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. चिखल निर्माण झाल्यास बस बंद होऊ शकते. त्यामुळे सदर मार्गाची बांधकाम विभागाने दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: The Dhanora-queue route got knocked out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.