धानोरा, चामोर्शी कडकडीत बंद
By Admin | Updated: January 17, 2016 01:14 IST2016-01-17T01:14:16+5:302016-01-17T01:14:16+5:30
ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने गडचिरोली शहर वगळता संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी ...

धानोरा, चामोर्शी कडकडीत बंद
ओबीसी आक्रमक : आरमोरी, देसाईगंज येथे शाळा, महाविद्यालये बंद; आष्टीतही चांगला प्रतिसाद
गडचिरोली : ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने गडचिरोली शहर वगळता संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी बाजारपेठ व शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला धानोरा, चामोर्शी व आष्टी या तीनच शहरांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. आरमोरी व देसाईगंज शहरातील केवळ शाळा, महाविद्यालये बंद होती. बाजारपेठ मात्र सुरू होती. जिल्ह्यातील ही ठिकाणे वगळता इतर तालुक्यांमध्ये बंदला तुरळक प्रतिसाद मिळाला.
ओबीसी व इतर प्रवर्गातील जातनिहाय जनगणना २०११ ची आकडेवारी तत्काळ जाहीर करावी, ओबीसी भटके विमुक्त यांच्याकरिता स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करून अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करावी, ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे, राज्यपालांनी ९ जून रोजी काढलेल्या अधिसूचनेत सुधारणा करून स्थानिकांना लोकसंख्येच्या प्रमाणात नोकरीची संधी द्यावी, ओबीसी विद्यार्थ्यांना पाचवीपासून शिष्यवृत्ती लागू करावी, सर्व अभ्यासक्रमांना १०० टक्के शिष्यवृत्ती द्यावी, शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाच्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात, ओबीसीसाठी असणारी नॉन क्रिमिलेअर अट रद्द करावी, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यावे, वनहक्क जमिनीसाठी इतर शेतकऱ्यांना असणारी तीन पिढ्यांची अट रद्द करावी, इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकूल योजनेमध्ये ओबीसी समाज बांधवांना लोकसंख्येच्या घरकूल मंजूर करावे आदी मागण्यांसाठी १६ जानेवारी रोजी शाळा महाविद्यालय व बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र या आवाहनाला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला.
चामोर्शी
चामोर्शी शहरासह तालुक्यातील सर्व गावांमध्ये कडकडीत बंद पाडण्यात आला. कडकडीत बंदमध्ये ग्रामीण भागातील भेंडाळा, धारगाव, कोनसरी, लखमापूर बोरी, अड्याळ, अनखोडा, आमगाव (म.), नवेगाव रै., तळोधी मो., कुनघाडा रै. आदी गावांनी सहभाग घेतला. चामोर्शी शहरातील शाळा, महाविद्यालये, चहाटपऱ्या, हॉटेल, दुकाने, अशासकीय कार्यालये सर्वच बंद ठेवण्यात आली होती. बंद पाडण्यासाठी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष राहूल नैताम, नगरसेवक, वैभव भिवापुरे, आशिष पिपरे, निशांत नैताम, विलास बुरे, नगरसेवक अविनाश चौधरी, देवाजी बुरांडे, मोनू मानापुरे, आशिष आभारे, किरण आकुलवार, प्रफुल भांडेकर, प्रशांत वालदे, कालिदास बुरांडे, सुधीर गडपायले, निकू झलके यांनी सहकार्य केले. भेंडाळा पंचायत समिती क्षेत्रात पंचायत समिती सदस्य प्रमोद भगत यांच्या मार्गदर्शनात बंद पाळण्यात आला.
धानोरा
ओबीसी संघटना धानोरा यांच्यावतीने धानोरा बंदचे आवाहन करण्यात आले. या बंदला धानोरा येथे चांगला प्रतिसाद मिळाला. शाळा, महाविद्यालयांसह बाजारपेठ दिवसभर बंद होती. बंद यशस्वी करण्यासाठी राजू मोहूर्ले, विनोद लेनगुरे, मून्ना चंदेल, कपील म्हशाखेत्री, रोहन ठाकरे, शारीक शेख, नाना पाल, नगरसेवक समीर कुरेशी, विनोद निबोंरकर, राकडे महाराज, राऊत, गजानन भोयर, नाकतोडे आदींनी सहकार्य केले.
आष्टी
बंदला आष्टी येथे चांगला प्रतिसाद मिळाला. चहाटपरी, पानठेले, दुकाने, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. बंदमुळे आष्टी शहरात शुकशुकाट पसरला होता. मेडीकल स्टोअर्स वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. या बंदचे नेतृत्व ओबीसी संघटनेचे कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य राकेश बेलसरे, कपील पाल, गणेश चौधरी, महेश चौधरी, अंतू तांगडे, नामदेव बोरकुटे, मंगेश पोरटे, चंदू झाडे, राजू एडलावार, पंकज येलमुले, अनुप एडलावार, महेश सहारे, अरूण चौधरी, रेखा ढपसक यांनी केले.
आरमोरी
येथील बाजारपेठ दिवसभर सुरू होती. मात्र शाळा, महाविद्यालयांनी कडकडीत बंद पाळला. शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यासाठी ओबीसी संघर्ष कृती समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते पंकज खरवडे, भारत बावणथडे, नंदू नाकतोडे, नंदू पेट्टेवार, रूपेश गजपुरे, राजू कंकटवार, चंदू आकरे, खुशाल नैताम, विलास पारधी, सागर मने, गणेश बैरवार, सुरज हेमके, आशिष लाडे, राहूल टिचकुले, गोलू वाघरे, रोहित धकाते, राहूल तितीरमारे, प्रसाद साळवे, सुधीर सपाटे यांनी सहकार्य केले.
देसाईगंज
देसाईगंज शहरातील शाळा, महाविद्यालये काही प्रमाणात बंद ठेवण्यात आली होती. बंदचे नेतृत्व नरेंद्र गजपुरे, दुमदेव कुकडकर, कमलेश बारस्कर, बालाजी ठाकरे, सचिन वानखेडे, अरूण कुंभलवार, ताराचंद बडवाईक, प्रेमचंद देशमुख, गिरीष देशमुख, पवन तुपट, खुशाल दोनाडकर, परशुराम ठाकरे, धनंजय मुंडले, होमराज हारगुळे, क्षिरसागर राऊत, गजू नाईक, कमलाकर दुधकुवर, सुखदेव गोटे, रमेश मडावी, जितेंद्र बनकर, सचिन वैद्य, सागर सहारे, गौरव नागपुरकर, अनिल मिसार, ईश्वर रामटेके, विलास ढोरे, गरीबदास बाटबर्वे, कैलाश कुथे यांनी केले.