तहसील कार्यालयावर धडकला मोर्चा

By Admin | Updated: December 24, 2014 22:59 IST2014-12-24T22:59:21+5:302014-12-24T22:59:21+5:30

१९९६ च्या पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, पेसा कायद्याबाबत जनजागृती करण्यात यावी, तसेच २००६ च्या वनाधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून आदिवासींना न्याय द्यावा,

Dhadkal Morcha on Tehsil office | तहसील कार्यालयावर धडकला मोर्चा

तहसील कार्यालयावर धडकला मोर्चा

भारत जनआंदोलनाच्या नेतृत्वात : हजारो आदिवासी नागरिकांचा सहभाग; निवेदन सादर
धानोरा : १९९६ च्या पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, पेसा कायद्याबाबत जनजागृती करण्यात यावी, तसेच २००६ च्या वनाधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून आदिवासींना न्याय द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी आज बुधवारला भारत जनआंदोलनाच्यावतीने धानोरा तहसील कार्यालयावर हजारोंच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व भारत जनआंदोलनाचे प्रमुख हिरामन वरखडे, विजय लपालीकर, डॉ. महेश कोपुलवार, हिरालाल येरमे, रोहिदास येरमे, जि. प. सदस्य अमोल मारकवार, मनिरावण दुग्गा, कुलपती मेश्राम आदींनी केले. सन्मानाने जगण्याचा अधिकार अभियानच्या धर्तीवर आज बुधवारला स्थानिक मॉ दंतेश्वरी मंदिराच्या ठिकाणाहून लक्षवेधी मोर्चा काढण्यात आला. पेसा कायद्याच्या स्थापना दिवसावर आयोजित सदर मोर्चा धानोरा शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आला. त्यानंतर सदर मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला.
यावेळी भारत जनआंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले. या निवेदनात वनाधिकार कायद्यातील कलम ३ (१) (ई) नुसार जिल्ह्यातील माडिया, गोंड या आदीम जमाती समूहाला त्यांच्या समूहवस्ती व इतर पारंपरिक धारणा अधिकार लागू करण्यात यावे, राज्यपालांच्या निर्देशाने सध्या स्थगीत ठेवलेले ‘महाराष्ट्र ग्रामवन नियम २०१४’ हे पूर्णपणे रद्द करण्यात यावे, अनुसूचित क्षेत्रातील आदिवासीकडून बेकायदेशिरपणे बळकाविलेल्या शेतजमिनी परत करण्यात याव्या, तसेच भूहस्तांतरणाची संपूर्ण माहिती ग्रामसभांना पाठविण्यात यावी, वैयक्तिक वनहक्कधारक शेतकऱ्यांना मिळालेले पट्टे दुरूस्त करून त्वरित संपूर्ण मालकी हक्क असलेले दस्ताऐवज देण्यात यावे, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे थकीत वीज बिल माफ करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
या मोर्चात आयटक संघटनेचे पदाधिकारी देवराव चवळे, बाजीराव उसेंडी, गंगाराम आतला आदींसह धानोरा तालुक्यातील कारवाफा, पेंढरी, गट्टा, मुंगनेर, चव्हेला आदी परिसरातून हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते. या मोर्चादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Dhadkal Morcha on Tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.