नॅशनल हायवेनंतर सिरोंचाच्या विकासाला गती मिळणार

By Admin | Updated: September 8, 2015 03:43 IST2015-09-08T03:43:58+5:302015-09-08T03:43:58+5:30

तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग जाणार असून या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर सिरोंचा तालुक्यात उद्योग निर्मितीला

The development of Sironcha will get momentum after National Highway | नॅशनल हायवेनंतर सिरोंचाच्या विकासाला गती मिळणार

नॅशनल हायवेनंतर सिरोंचाच्या विकासाला गती मिळणार

सिरोंचा : तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग जाणार असून या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर सिरोंचा तालुक्यात उद्योग निर्मितीला चालना मिळेल व त्यानंतर सिरोंचा तालुक्याच्या विकासाला गती प्राप्त होईल. त्यामुळे सदर मार्गाच्या कामाला तत्काळ सुरूवात व्हावी, यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
सिरोंचा येथील तहसील कार्यालयात समाधान शिबिर व जनता दरबाराचे आयोजन सोमवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर अहेरीचे प्रभारी उपविभागीय अधिकारी एस. आर. पुप्पलवार, प्रभारी तहसीलदार सत्यनारायण कडार्लावार, रामेश्वर अरगेला, संदीप राचर्लावार, रंगू बापू, कार्यकारी अभियंता मेश्राम, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी पवार, उपअभियंता रणशिंगे, संवर्ग विकास अधिकारी मरस्कोल्हे, अब्बास आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे मार्गदर्शन करताना पालकमंत्री म्हणाले की, मागील सहा महिन्यात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी ३६ कोटी रूपयांची कामे आणली आहेत. सिरोंचा येथे स्वतंत्र बाजार समिती निर्माण करण्यात आली. सोमनूर संगमाच्या विकासासाठी १ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. सिरोंचा येथे चांगल्या दर्जाचा बसडेपो बांधला जाईल, असे प्रतिपादन केले. समाधान शिबिरात अनेक नागरिकांनी निवेदन सादर केले होते. ही निवेदने संबंधित विभागाकडे पाठवून त्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)

मन्नेवार समाजाच्या उपोषणाची सांगता
४जात वैधता प्रमाणपत्राच्या मागणीसाठी मागील सात दिवसांपासून सिरोंचा तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या मन्नेवार (मन्नेपवार) समाजाच्या साखळी उपोषणाची पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या भेटीनंतर सांगता करण्यात आली. अर्धा तास उपोषणकर्त्याशी पालकमंत्र्यांनी चर्चा केली व जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्याचे आश्वासन त्यांना दिले. गडचिरोली येथील अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून प्रमाणपत्राची समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांना निंबू शरबत पाजून उपोषणाची सांगता झाली.

Web Title: The development of Sironcha will get momentum after National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.