चार कोटींच्या निधीतून होणार शहराचा विकास
By Admin | Updated: April 8, 2016 01:20 IST2016-04-08T01:20:53+5:302016-04-08T01:20:53+5:30
गडचिरोली नगर पालिकेतील अनेक विकास कामे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे थंडबस्त्यात होती.

चार कोटींच्या निधीतून होणार शहराचा विकास
निविदा निघाली : न. प. बांधकाम सभापतींचा पुढाकार
गडचिरोली : गडचिरोली नगर पालिकेतील अनेक विकास कामे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे थंडबस्त्यात होती. त्यामुळे शहरातील विकास कामांसाठी निधीही उपलब्ध होत नव्हता. ही बाब लक्षात आल्यानंतर नगर परिषदेच्या बांधकाम सभापती पदाची सूत्रे स्वीकारलेल्या प्रा. राजेश कात्रटवार यांनी शासन दरबारी वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे गडचिरोली शहराच्या विकासासाठी चार कोटी रूपयांच्या निधीच्या विकास कामांची निविदा निघाली आहे. त्यामुळे शहरातील विकास कामे होण्यास मदत होणार आहे.
नगर पालिका प्रशासनातील मुख्याधिकारी शहराच्या विकास कामांकडे विशेष लक्ष देत नव्हते. त्यामुळे शहरातील अनेक विकास कामे थंडबस्त्यात होती. परंतु न. प. बांधकाम सभापती पदाची सूत्रे घेतल्यानंतर प्रा. राजेश कात्रटवार यांनी शहर विकासासाठी शासन दरबारी केलेल्या वारंवारच्या पाठपुराव्यामुळे शहराच्या विकासासाठी चार कोटींच्या विकासकामांसाठी निविदा निघाली आहे. नगर पालिकेला दलितवस्ती सुधार व नगर उद्यान योजनेचा कोट्यवधी रूपयांचा निधी आला होता. मात्र मागील वर्षी एकाही विकास कामाची ई- निविदा निघाली नाही. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने गडचिरोली शहर माघारले होते. प्रा. राजेश कात्रटवार यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, खासदार, आमदार यांच्याकडे निवेदन सादर करून शहरातील विकासासाठी निधी उपलब्ध करून ई- निविदा काढण्याची मागणी केली. त्यामुळे आता पालिकेने चार कोटी रूपयांची विकास कामांची ई- निविदा काढली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा ३० कोटी रूपयांचा निधी नगर पालिकेच्या विकास कामांकरिता खेचून आणण्यात आला आहे. याकरितासुद्धा कात्रटवार यांनी विशेष प्रयत्न केले होते. या सर्व निधीमधून गडचिरोली शहर विकासाला चालना मिळेल. तसेच शहरातील थंडबस्त्यात राहिलेली विविध विकास कामे लवकरच मार्गी लागतील, अशी आशा शहरवासीयांमध्ये व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)