योजनांच्या लाभातून विकास साधा
By Admin | Updated: August 26, 2015 01:15 IST2015-08-26T01:15:45+5:302015-08-26T01:15:45+5:30
पोलीस विभाग व सीआरपीएफमार्फत सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जातात.

योजनांच्या लाभातून विकास साधा
सातपुती येथे जनजागरण मेळावा : पोलीस अधिकाऱ्यांचे आवाहन
कोरची : पोलीस विभाग व सीआरपीएफमार्फत सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी आपली प्रगती साधावी, असे आवाहन बेडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस अधिकारी चव्हाण यांनी केले.
पोलीस मदत केंद्र बेडगावच्या वतीने तालुक्यातील सातपुती येथे जनजागरण मेळावा शनिवारी घेण्यात आला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सातपुती ग्राम पंचायतीचे सदस्य माहेर होळी, पोलीस उपनिरीक्षक दळवी आदी उपस्थित होते.
या मेळाव्यात पोलीस विभागाच्या वतीने शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलच्या माध्यमातून पोलीस कर्मचारी नागरिकांना योजनांची आवश्यक माहिती देऊन कागदपत्रांची पूर्तता करण्याचे सांगितले. याप्रसंगी बोलतांना मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक दळवी म्हणाले, जनजागरण मेळाव्यातून मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या माहितीच्या आधारे नागरिकांनी प्रयत्न करावेत, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पोलीस विभागाचे समन्वय ठेवावा, असे दळवी यांनी सांगितले.
आदिवासी नागरिकांच्या कल्याणासाठी शासनाने अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. मात्र या योजनांची कोरचीसारख्या दुर्गम भागातील नागरिकांना परिपूर्ण माहिती मिळत नसल्याने अनेक गरजू नागरिक योजनांच्या लाभापासून वंचित असतात. योजनांची परिपूर्ण माहिती मिळावी, यासाठी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण देऊन भावी पिढी सुजाण घडवावी, असे आवाहनही पोलीस अधिकारी चव्हाण यांनी यावेळी केले. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)