व्यसनमुक्तीची कास धरून विकास साधा
By Admin | Updated: October 24, 2016 01:53 IST2016-10-24T01:53:49+5:302016-10-24T01:53:49+5:30
तंबाखू, दारू, सिगारेट व अन्य व्यसनांमुळे माणसाची अधोगती होते. व्यसनामुळे कुठलाच फायदा होत नाही.

व्यसनमुक्तीची कास धरून विकास साधा
देसाईगंजात जाहीर कीर्तन : सत्यपाल महाराजांचे नागरिकांना आवाहन
देसाईगंज : तंबाखू, दारू, सिगारेट व अन्य व्यसनांमुळे माणसाची अधोगती होते. व्यसनामुळे कुठलाच फायदा होत नाही. उलट माणसाला विविध प्रकारचे आजार जळतात. त्यामुळे साधू, संतांनी दिलेल्या उपदेशानुसार जीवनात आचरण करून व्यसनाला तिलांजली द्या, व्यसनमुक्तीतून आपल्या कुटुंबाचा व गडचिरोली जिल्ह्याचा विकास साधा, असे आवाहन प्रसिद्ध कीर्तनकार सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांनी केले.
स्थानिक दीक्षाभूमी मैदानावर सर्च शोधग्राम, महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्तीपथ कार्यक्रमाअंतर्गत शनिवारी आयोजित जाहीर कीर्तनात सत्यपाल महाराज बोलत होते.
यावेळी सत्यपाल महाराज यांनी विविध प्रकारचे दाखले देऊन व्यसनमुक्तीवर उपस्थित नागरिकांचे प्रबोधन केले. व्यसनाधिन होऊन आपल्या घरी तमाशा करण्यापेक्षा देशाच्या सीमेवर जाऊन विरोधी देशाच्या सैैनिकांपुढे ताकद दाखवा, विरोधकांच्या सैनिकांना पराभूत करण्याची कुवत दारूड्या माणसात नाही. मात्र अनेक मद्यपी लोकांनी दारूच्या आहारी जाऊन आपल्या कुटुंबीयांना प्रचंड त्रस्त केले आहे. व्यसनापासून दूर जाण्याचे आवाहन प्रत्येक संतांनी केले. मात्र सध्या समाजात संतवाणीला जागाच उरली नसल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. कायद्याने दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारूचा महापूर मोठ्या प्रमाणात वाहत आहे, जिल्ह्यातील हजारो तरूण दारूच्या व्यसनात अडकले आहेत, अशी खंतही सत्यपाल महाराज यांनी कीर्तनातून व्यक्त केली.
गडचिरोली जिल्हा व्यसनमुक्त होण्यासाठी प्रशासनाचा प्रत्येक विभाग कार्यक्षम झाला पाहिजे. व्यसनमुक्तीच्या जनजागृतीसाठी प्रशासनाच्या प्रत्येक विभागाने कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केल्यास समाज १०० टक्के व्यसनमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, असेही सत्यपाल महाराज यावेळी म्हणाले.