योजनेच्या लाभातून विकास साधा
By Admin | Updated: January 18, 2017 01:43 IST2017-01-18T01:43:23+5:302017-01-18T01:43:23+5:30
तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने विविध कल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या आहेत.

योजनेच्या लाभातून विकास साधा
दिवाणी न्यायाधीशांचे आवाहन : धानोरात हक्क, संरक्षणावर कायदेविषयक शिबिर
धानोरा : तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने विविध कल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन आदिवासींनी विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन धानोराचे दिवाणी न्यायाधीश तथा विधी सेवा समितीचे अध्यक्ष ली. दा. कोरडे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या वार्षिक आराखडा २०१७ च्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती व धानोरा न्यायालयाच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी दुपारी ‘आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व अंमलबजावणी योजना २०१५’ या विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी न्या. कोरडे बोलत होते. याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून संवर्ग विकास अधिकारी डी. पी. सपाटे, गटविकास अधिकारी नीलेश वानखेडे, अधिवक्ता टी. के. गुंडावार, सहायक सरकारी अभियोक्ता खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आरोग्य योजनांबाबतची माहिती विस्ताराने दिली. भारतीय राज्यघटनेच्या अधिकारानुसार विकासापासून वंचित असलेल्या प्रत्येक नागरिकाला शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा हक्क आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून नागरिकांनी योजनेची अद्यावत माहिती ठेवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन पंचायत विस्तार अधिकारी सावसाकडे यांनी केले तर आभार पंचायत विस्तार अधिकारी एल. बी. जुवारे यांनी मानले. याप्रसंगी बहुसंख्य ग्रामसेवक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी धानोरा पं. स. चे कक्ष अधिकारी शिवणकर यांच्यासह कर्मचारी व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)