५५ व्यसनींचा दारूमुक्त हाेण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:52 IST2021-02-05T08:52:09+5:302021-02-05T08:52:09+5:30
गडचिरोली : मुक्तिपथ अभियानाच्या वतीने व्यसनी रुग्णांवर उपचार करण्यासाठी कुरखेडा, अहेरी, चामोर्शी व सिरोंचा तालुक्यात दर शुक्रवारी तालुका क्लिनिकचे ...

५५ व्यसनींचा दारूमुक्त हाेण्याचा निर्धार
गडचिरोली : मुक्तिपथ अभियानाच्या वतीने व्यसनी रुग्णांवर उपचार करण्यासाठी कुरखेडा, अहेरी, चामोर्शी व सिरोंचा तालुक्यात दर शुक्रवारी तालुका क्लिनिकचे आयोजन केले जाते. २९ जानेवारी रोजी चारही तालुका कार्यालयांत आयोजित क्लिनिकला एकूण ५५ रुग्णांनी भेट देऊन उपचार घेत दारूचे व्यसन साेडण्याचा निर्धार केला.
आलापल्ली शहरातील मुक्तिपथ तालुका कार्यालयात २३ रुग्णांनी क्लिनिकला भेट देऊन उपचार घेतला. यात महिला रुग्णांचादेखील समावेश आहे. सिरोंचातील रामाराव दुधीवार यांच्या घरी असलेल्या तालुका कार्यालयात सहा रुग्णांवर, चामोर्शी येथील पोस्ट ऑफिसजवळील कार्यालयात १५ रुग्णांवर तर कुरखेडातील नवीन बस स्टॅण्डजवळच्या तालुका कार्यालयात ११ रुग्णांवर उपचार करण्यात आले. या चार तालुक्यांत क्लिनिकच्या माध्यमातून एकूण ५५ रुग्णांनी उपचार घेत दारू सोडण्याचा निर्धार केला.
क्लिनिकला भेट देणाऱ्या रुग्णांचे समुपदेशन केले जाते. दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषधोपचार घेणे आदींची माहिती रुग्णांना सांगण्यात येते. मुक्तिपथ तालुका कार्यालयांमध्ये ठरावीक दिवशी क्लिनिकचे आयोजन केले जाते. दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असणाऱ्या जास्तीतजास्त रुग्णांनी क्लिनिकला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.