मारहाण करणाऱ्या आरोपीस कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 23:49 IST2019-04-25T23:49:10+5:302019-04-25T23:49:42+5:30
दगडाने मारहाण करणाऱ्या आरोपीस गडचिरोली न्यायालयाने दोन वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच १० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेशही दिला आहे.

मारहाण करणाऱ्या आरोपीस कारावास
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दगडाने मारहाण करणाऱ्या आरोपीस गडचिरोली न्यायालयाने दोन वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच १० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेशही दिला आहे.
वामन विठ्ठल पेंदाम (३४) रा. राजागाटा चेक ता. गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे. आरोपी वामन व फिर्यादी लालाजी बापुजी नैताम हे दोघेही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पानठेल्यावर बसून होते. दोघांमध्ये वाद निर्माण झाला. आरोपीने अचानक दगड फिर्यादीच्या डोक्यात मारले. त्यामुळे डोक्याला जखम झाली. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द ५ आॅक्टोबर २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार रोहणकर यांनी तपास केला व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपीविरोधात सबळ पुरावे आढळून आल्याने प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एन. सी. बोरफळकर यांनी आरोपी वामन पेंदाम याला भादंवि ३२४ अन्वये दोन वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास तसेच फिर्यादीला १० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अमर फुलझेले यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार यशवंत मलगाम, कोर्ट मोहरर सुभाष सोरते यांनी जबाबदारी सांभाळली.