विविध शासकीय योजनांची दिली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2016 01:42 IST2016-10-27T01:42:20+5:302016-10-27T01:42:20+5:30
जिल्हा पोलीस प्रशासन व पोलीस स्टेशन देसाईगंजच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी तालुक्यातील पिंपळगाव

विविध शासकीय योजनांची दिली माहिती
पिंपळगावात जनजागरण मेळावा : ७०० नागरिकांची उपस्थिती
देसाईगंज : जिल्हा पोलीस प्रशासन व पोलीस स्टेशन देसाईगंजच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी तालुक्यातील पिंपळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात विविध विभागाच्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. तसेच या योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधण्याचे आवाहन केले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीचे शिक्षण विस्तार अधिकारी आर. एच. भैसारे होते. तर उद्घाटक म्हणून देसाईगंजचे पोलीस उपनिरीक्षक सुहेल पठाण, महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे अभियंता पी. पी. शेंडे तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक सचिन मानकर, वनकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक गजबे, भूमी अभिलेख कार्यालयाचे डी. पी. सावळे, कृषी सहकायक एस. एस. बडोले, शंकरपूरचे मंडळ अधिकारी डी. बी. रामटेके, क्षेत्र सहायक कोसमशिले, आरोग्य विभागाचे सोमनकर, पिंपळगावच्या सरपंच शकुंतला शेंडे, उपसरपंच गजेंद्र राऊत, माजी सरपंच कृष्णा राऊत, हिरालाल प्रधान, इंदिरा आश्रमशाळेचे शिक्षक बारई, जि. प. शाळेचे शिक्षक हटवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्यात विविध विभागामार्फत स्टॉल लावून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सुहेल पठाण यांनी आदिवासी बांधवांकरिता लागू करण्यात आलेल्या पेसा कायद्याची सविस्तर माहिती दिली. तसेच युवकांनी स्पर्धा परीक्षेकडे वळावे, असे सांगितले. मेळाव्याला ७०० नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)