पिंपळगाव परिसरात रानगव्यांकडून पिकांची नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:44 IST2021-02-17T04:44:19+5:302021-02-17T04:44:19+5:30

देसाईगंज : तालुक्यातील पिंपळगाव (ह.) परिसरात रानगव्यांचा वावर आहे. रानगव्यांकडून शेतातील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान केले जात असल्याने शेतकरी ...

Destruction of crops by pigeons in Pimpalgaon area | पिंपळगाव परिसरात रानगव्यांकडून पिकांची नासधूस

पिंपळगाव परिसरात रानगव्यांकडून पिकांची नासधूस

देसाईगंज : तालुक्यातील पिंपळगाव (ह.) परिसरात रानगव्यांचा वावर आहे. रानगव्यांकडून शेतातील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान केले जात असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. वन विभागाने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

वडसा वन विभागांतर्गत येणाऱ्या पिंपळगाव (ह.) परिसरात घनदाट जंगल असून जंगलात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा वावर आहे. वन्य प्राणी लगतच्या शेतात शिरून धुडगूस घालत असल्याने उभ्या पिकांची नासधूस हाेत आहे. या जंगल परिसरात एकूण ८ रानगवे आहेत. याशिवाय हिंस्र प्राण्यांचा वावरसुद्धा आहे. जंगल सीमेवर ताराचे कुंपण अथवा योग्य उपाययोजना करण्यात न आल्याने वन्य प्राण्यांच्या संचारामुळे शेतातील उभ्या पिकाचे संरक्षण करणेही अलीकडे अवघड होऊ लागले आहे. वडसा वन विभागाने या गंभीर बाबीची दखल घेऊन हैदोस घालणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या. तसेच परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे लवकर करून भरपाईसाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठवावे, अशी मागणी पिंपळगावातील शेतकऱ्यांनी केली आहे.

बाॅक्स

हिंस्र प्राण्यांमुळे शेतकऱ्यांना धाेका

देसाईगंज तालुक्यातील पिंपळगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती जंगलाला लागून आहे. जंगलाच्या रस्त्यानेच शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. परिसरातील जंगलात विविध हिंस्र प्राण्यांचा वावर आहे. सध्या कडधान्य पिकांची काढणी सुरू आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांनी मका, मिरची व रबी धानाची लागवड केली आहे. त्यामुळे शेतकरी शेतात जातात. शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांवर कोणत्याही क्षणी वन्य प्राणी हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीवितहानी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Destruction of crops by pigeons in Pimpalgaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.