गडचिरोली जंगलात १६ नक्षलींचा खात्मा; महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 02:44 IST2018-04-23T02:44:02+5:302018-04-23T02:44:02+5:30
भागरागड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताडगावपासून ७ किमी अंतरावरील कसनासूर जंगलात पोलिसांचे जवान गस्त घालत होते.

गडचिरोली जंगलात १६ नक्षलींचा खात्मा; महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई
गडचिरोली/नागपूर : गडचिरोलीच्या जंगलात रविवारी नक्षलवादविरोधी अभियानातील पोलिसांच्या कारवाईत १६ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यात दोन नक्षली कमांडरचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. यापूर्वी ३ एप्रिलला तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.
भागरागड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताडगावपासून ७ किमी अंतरावरील कसनासूर जंगलात पोलिसांचे जवान गस्त घालत होते. नक्षल्यांनी अचानक त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. धुमश्चक्रीनंतर काही नक्षलवादी पळाले. संध्याकाळपर्यंत १६ नक्षल्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले. सर्व मृतदेह हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी बंदुका व इतर साहित्यही जप्त केले आहे.
घटनेनंतर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हेलिकॉप्टरने तातडीने भामरागडकडे रवाना झाले, अशी माहिती नक्षलविरोधी अभियानाचे महानिरीक्षक शरद शेलार यांनी दिली.
नक्षलींवर लक्ष ठेवण्यास शाखा
नक्षलवादी नेते आणि त्यांच्याबाबत सहानुभूती ठेवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एनआयएची एक विशिष्ट शाखा स्थापन करण्यात येत आहे. गृहमंत्रालयाने अलीकडेच या कामासाठी एनआयएमध्ये विशिष्ट शाखा स्थापन करण्यास मंजुरी
दिली आहे. दहशतवाद्यांना निधी पुरविण्याच्या प्रकरणात काश्मिरी फुटीरतावाद्यांविरुद्ध एनआयए तपासानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
दोघांवर प्रत्येकी १६ लाखांचे बक्षीस
साईनाथ उर्फ डोलेश माजी आत्राम, तसेच श्रीनू उर्फ गीतेंद्र नरसिम्हा रामल्लु या नक्षल नेत्यांचा मृतांमध्ये समावेश आहे. त्यांच्यावर प्रत्येकी १६ लाखांचे बक्षीस होते. इतर नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.