वाहनाच्या धडकेत पाच दुकाने उद्ध्वस्त
By Admin | Updated: April 1, 2016 01:47 IST2016-04-01T01:47:05+5:302016-04-01T01:47:05+5:30
देसाईगंजवरून गडचिरोलीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जुना बसस्थानक परिसरातील रस्त्याच्या बाजुला असलेली फुटपाथवरील दुकानांना धडक

वाहनाच्या धडकेत पाच दुकाने उद्ध्वस्त
लाखो रूपयांचे नुकसान : वाहनचालक वाहनासह झाला पसार
आरमोरी : देसाईगंजवरून गडचिरोलीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जुना बसस्थानक परिसरातील रस्त्याच्या बाजुला असलेली फुटपाथवरील दुकानांना धडक दिल्याने पाच दुकाने उद्ध्वस्त झाली. यामध्ये दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आरमोरी जुना बसस्थानकाजवळ मुख्य मार्गाच्या बाजुला अनेक व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. रात्री आपली दुकाने बंद करून गेले असता, बुधवारी रात्रीच्या सुमारास गडचिरोलीकडे जाणाऱ्या वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन रस्त्याच्या बाजुला गेले. वाहनाच्या धडकेत पाच दुकानांचा चुराडा झाला. वाहन चालक मात्र वाहन घेऊन पसार झाला. त्यामुळे नेमक्या कोणत्या वाहनाने हे नुकसान केले. हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेले नाही. यामध्ये दुकानदारांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या दुकानांमध्ये युवा सेनेचे शहर प्रमुख विनोद निखुरे यांचा बुट हाऊस, योगेश धकाते यांचा पान सेंटर, प्रफुल कोल्हे यांचा भाजीपुरीचा दुकान, राजू जुआरे यांचा स्वीट मार्ट व गणेश लांजेवार यांचा सलुनचे दुकान उद्ध्वस्त केले. याबाबतची तक्रार आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे.
या मार्गावर दिवसभर नेहमीच वाहनांची वर्दळ राहते. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक देण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे तसेच ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी या परिसरात भरधाव वेगातील वाहनांमुळे अपघातांमध्ये वाढ झाली आहे. (वार्ताहर)