गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केली दोन नागरिकांची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 12:43 IST2019-12-02T10:08:36+5:302019-12-02T12:43:52+5:30
नक्षलवादी संघटना पीएलजीए (पिपल्स लिबरेशन गुरिला आर्मी) च्या वर्धापन दिनानिमित्त आजपासून (दि.2) पाळल्या जात असलेल्या विशेष सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत दोघांची हत्या केली.

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केली दोन नागरिकांची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलवादी संघटना पीएलजीए (पिपल्स लिबरेशन गुरिला आर्मी) च्या वर्धापन दिनानिमित्त आजपासून (दि.2) पाळल्या जात असलेल्या विशेष सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत दोघांची हत्या केली. याशिवाय काही ठिकाणी रस्त्यावर झाडं टाकून मार्ग अडवत बॅनरबाजी केल्याने दहशत पसरली आहे.
पोलिसांना सहकार्य करत असल्याच्या संशयातून मध्यरात्रीच त्यांचे घरातून अपहरण केल्याची माहिती आहे. आज सकाळी त्यांचे मृतदेह आढळले.
मासो ढेबला पुंगाटी (५५) व ऋषी लालू मेश्राम (५२) अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही खाणकामावर जात असल्याचा रोष नक्षल्यांच्या मनात असल्याने त्यांची हत्या झाल्याचे सांगितले जाते.
याशिवाय कमलापूर-दामरंचा मार्गावर रस्त्यालगतची झाडे कापून टाकली. त्यामुळे हा मार्ग अडला असून त्या भागात बॅनर लावून पीएलजीए सप्ताह पाळण्याचे आवाहन केल्याचे कळते. पोलिसांनी त्या भागात जाण्यास मनाई केली आहे. कमलापूर हा काही वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांचा गड होता. पण अलीकडे पोलिसांचे नेटवर्क वाढल्याने त्या भागातील नक्षलवाद्यांचा वावर कमी झाला आहे. पण पीएलजीए सप्ताहाच्या निमित्ताने नक्षलवादी आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.