देसाईगंजातील एटीएमसेवा कोलमडली

By Admin | Updated: March 8, 2017 02:14 IST2017-03-08T02:14:16+5:302017-03-08T02:14:16+5:30

नोटबंदीच्या निर्णयापासून देसाईगंज शहरातील एटीएम सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. संपूर्ण शहराचा भार एसबीआय एटीएमवर होता.

DesaiGanj's ATM service collapsed | देसाईगंजातील एटीएमसेवा कोलमडली

देसाईगंजातील एटीएमसेवा कोलमडली

ग्राहक त्रस्त : एसबीआयचे एटीएम चार ग्राहकांनी पैसे काढल्यानंतर पडते बंद
देसाईगंज : नोटबंदीच्या निर्णयापासून देसाईगंज शहरातील एटीएम सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. संपूर्ण शहराचा भार एसबीआय एटीएमवर होता. मात्र सदर एटीएममध्येही शुक्रवारपासून बिघाड निर्माण झाल्याने देसाईगंज शहरातील ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. मार्च महिन्याचा प्रारंभ असल्याने अनेकांना कर्जाचे हप्ते भरण्याची घाई आहे. अशातच एटीएम बंद असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
देसाईगंज शहरात स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया, युनियन बँक, आयडीबीआय बँक, कोआॅपरेटीव्ह बँक आहे. यातील सर्वच बँकांचे एटीएम शहरात लावण्यात आले आहेत. नोटबंदीपासून या बँकांमध्ये रोकडचा तुटवडा असल्याने या बँकांचे एटीएम नावापुरतेच सुरू आहेत. केवळ एसबीआयचे एटीएम सुरू राहत होते.
या एटीएममध्ये अपवाद वगळता नेहमीच पैसे राहत नसल्याने या एटीएमसमोर नोटबंदीच्या कालावधीतही मोठी गर्दी राहत होती. शहरातील बहुतांश ग्राहक एसबीआय एटीएमच्या माध्यमातूनच पैसे काढतात. या एटीएममध्ये शुक्रवारपासून अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. चार ते पाच ग्राहकांनी पैसे काढल्यानंतर सदर एटीएम बंद पडते.
याबाबतची तक्रार बँकेकडे केल्यानंतर बँक कर्मचारी दुरूस्त करतात.पण आणखी काही वेळातच सदर एटीएम बंद पडते. त्यामुळे रांगेत लागलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागते.
याबाबत एसबीआयचे मॅनेजर बी. यू. वाघमारे यांना विचारणा केली असता, मागील तीन-चार दिवसांपासून एटीएममध्ये अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. याबाबतची तक्रार टेक्निशियनकडे करण्यात आली आहे.
एक-दोन दिवसात एटीएम दुरूस्त केले जाईल, अशी माहिती लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: DesaiGanj's ATM service collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.