देसाईगंज-आरमोरी मार्ग खड्ड्यात

By Admin | Updated: August 19, 2016 00:55 IST2016-08-19T00:55:36+5:302016-08-19T00:55:36+5:30

देसाईगंज-आरमोरी या राज्य महामार्गाचे दोन वर्षांपूर्वी अस्तरिकरण करण्यात आले होते. सदर अस्तरिकरण उखडले आहे.

Desaiganj-Armori route in the pothole | देसाईगंज-आरमोरी मार्ग खड्ड्यात

देसाईगंज-आरमोरी मार्ग खड्ड्यात

अस्तरीकरण उखडले : वाहनधारक त्रस्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे होत आहे दुर्लक्ष
देसाईगंज/आरमोरी : देसाईगंज-आरमोरी या राज्य महामार्गाचे दोन वर्षांपूर्वी अस्तरिकरण करण्यात आले होते. सदर अस्तरिकरण उखडले आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनधारक त्रस्त आहेत.
देसाईगंजवरून गडचिरोलीला जाण्यासाठी हा प्रमुख राज्य महामार्ग असून यामार्गावरून नेहमीच अवजड वाहने व दुचाकी वाहनांची वर्दळ राहते. देसाईगंज ते कोंढाळापर्यंत ते कोंढाळा ते कासवी फाट्यापुढील १ किमीपर्यंत या डांबरी मार्गावरचे अस्तरीकरण पूर्णत: उखडून गेल्याने मार्गाला मोठमोठ्या खाचा पडल्या आहेत. मूळ रस्त्याच्या निर्मितीनंतर आतापर्यंत लावलेले डांबराचे लेप पूर्णपणे निघून गेल्याने उंच बट्या पडल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून या मार्गावरील हे अस्तरीकरण उखडत चालले आहे. काही ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांवरून वाहन चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
देसाईगंजवासीयांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून दरदिवशी हजारो वाहने ये-जा करतात. खड्ड्यांमुळे व अस्तरीकरण निघाल्याने या मार्गावर अपघातांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. या मार्गावरून छत्तीसगडकडे जाणारे ट्रक चालत असल्याने रस्त्याची दुर्दशा आणखी वाढली आहे. मागील तीन वर्षांपासून या मार्गाची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे अवस्था बकाल झाली आहे.
सदर मार्ग दुरूस्तीबाबत देसाईगंज व आरमोरी येथील अनेक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या मार्गाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. दिवसेंदिवस खड्ड्यांचा आकार वाढत चालला आहे. आरमोरीजवळ खड्ड्यांची संख्या प्रचंडप्रमाणात असल्याने एक खड्डा चुकविला तरी दुसऱ्या खड्ड्यामध्ये वाहन जाऊन पडत असल्याने वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत. देसाईगंज येथे जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानक आहे. त्यामुळे दरदिवशी शेकडो नागरिक देसाईगंज येथे येतात. येथील रेल्वेस्थानकावर उतरविलेला माल जिल्हाभरात वितरित केला जातो. त्यामुळेही वाहनांची वर्दळ वाढली आहे. खड्ड्यांमुळे अपघातही वाढले आहेत. (तालुका/शहर प्रतिनिधी)

Web Title: Desaiganj-Armori route in the pothole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.